
जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, बधितांचा रेट अद्यापि खाली येण्यास तयार नसल्याचे चित्र असून जिल्ह्याचा कोरोनाबाधित रेट १३.२० टक्के आहे.
जालना : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, बधितांचा रेट अद्यापि खाली येण्यास तयार नसल्याचे चित्र असून जिल्ह्याचा कोरोनाबाधित रेट १३.२० टक्के आहे. तर कोरोना रिकव्हरी रेट हा ९५.१० टक्क्यांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या २९४ कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जालना शहरात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्येत भर पडत गेली.
त्यामुळे एप्रिल महिन्यांपासून आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ८७८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोविड रूग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य यंत्रणा यांच्या अथक परिश्रमामुळे १२ हजार २४७ कोरोनाबाधित रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा तब्बल ९५.१० टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे, हे विशेष. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून कमी झाल्याचे चित्र आहे.
मात्र, कोरोनाचा संसर्गाचा रेट कमी येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधित रूग्णांचा रेट हा १३.२० टक्के आहे. दरम्यान शनिवारी (ता.१९) जिल्ह्यात १४ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. यामध्ये जालना शहरात पुन्हा आठ, तालुक्यातील बोरी येथे एक, परतूर शहरातील एक, अंबड शहरतील एक व इतर जिल्ह्यातील बुलडाणा व औरंगाबाद येथील प्रत्येकी एक जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार २४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील २९४ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संपादन - गणेश पिटेकर