Jalna : कर्मचारी संपावर...मंत्री बांधावर...शेतकरी वाऱ्यावर! Jalna district Unseasonal rain hit crops entire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने गहू, ज्वारी

Jalna : कर्मचारी संपावर...मंत्री बांधावर...शेतकरी वाऱ्यावर!

जालना : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने गहू, ज्वारी पिकांसह फळपिकांना फटका बसल्याचे चित्र आहे. या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वडीगोद्री येथे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामे करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. मात्र,

जुनी पेन्शनसाठी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे करणार तरी कोण, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे अस्मानी संकटासह सुलतानी संकटात हे शेतकरी अडकल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागातील गहू, ज्वारीचे प्लॉट आडवे पडले आहेत. मात्र, या पिकांचे नुकसानीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे अधिकारी सांगत आहेत. शिवाय शासकीय नियमांनुसार ३३ टक्क्यांच्या आत हे नुकसान असल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगितले जाते आहेत. दरम्यान, शुक्रवारी (ता.१७) मध्यरात्री जालना शहरात सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघ गर्जनेसह विजाच्या कडकडाटात व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. या पावसामुळे उन्हाळ्यात पावसाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान शनिवारी (ता.१८) सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ३.८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली असून यात भोकरदन तालुक्यात ९.१, जाफराबाद तालुक्यात ७.१, जालना तालुक्यात ४, बदनापूर तालुक्यात ८.४ आणि मंठा तालुक्यात ०.५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद कृषी अधीक्षक कार्यालयाकडे झाली आहे.

जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहोत. शासकीय नियमानुसार या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

-भीमराव रणदिवे, कृषी अधीक्षक, जालना.

वादळी वाऱ्यामुळे आडवे पडलेल्या गहू, ज्वारीच्या उत्पादनात घट होऊ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. शिवाय हे वातावरण द्राक्ष बागांनाही मारक आहे.

- पंडित वासरे, कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना.

वडीगोद्री, अंतरवाली सराटी आदी ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे माझ्या शेतातील गव्हाचे नुकसान झाले. माझ्या सारख्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळाली पाहिजे. पण हे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या पेन्शनसाठी संपावर जाऊन बसले आहेत. शासनाने आम्हा शेतकऱ्यांनाही सरसकट मोठी आर्थिक मदत जाहीर करून ती तत्काळ खात्यात जमा करावी.

- नितीन कोटंबे, शेतकरी, अंतरवाली सराटी, ता. अंबड

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा व द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सतत नुकसान होते. नुकसानीची भरपाई देताना शासकीय नियमांची गंज आडवी उभी केली जाते. दुसरीकडे नोकरदार वर्गाला गडगंज पगार असताना पेन्शनची मागणी केली जाते. आम्हा शेतकऱ्यांनाही पीक नुकसानीची सरसकट मोठी आर्थिक मदत द्यावी.

-पांडुरंग जाधव, शेतकरी, पानेवाडी ता. घनसावंगी