जालना जिल्ह्याला कर्जमाफीचे 956 कोटी 45 लाख रूपये

उमेश वाघमारे
शुक्रवार, 23 मार्च 2018

पात्र शेतकऱ्यांपैकी एक लाख 23 हजार 905 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ झाला असून कर्जमाफीचे 956 कोटी 45 लाख रुपये जिल्ह्यातील 20 बँकांच्या शाखांमध्ये जमा झाल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

जालना - राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख 57 हजार 868 शेतकरी आतापर्यंत पात्र झाले आहेत. या पात्र शेतकऱ्यांपैकी एक लाख 23 हजार 905 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ झाला असून कर्जमाफीचे 956 कोटी 45 लाख रुपये जिल्ह्यातील 20 बँकांच्या शाखांमध्ये जमा झाल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेसंदर्भातील सध्यः परिस्थितीची जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी माहिती दिली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ता. 24 जुलै 2017 ते ता. 22 सप्टेंबर 2017 या काळामध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यात आले होते. जिल्ह्यातील दोन लाख 14 हजार 750 कुटुंबांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले होते. आतापर्यंत यापैकी एक लाख 57 हजार 868 पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी एक लाख 23 हजार 905 शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये 593 कोटी 99 लाख 48 हजार रुपयांचा लाभ देण्यात आले आहे. यामध्ये दीड लाखाच्या आतील 94 हजार 875 थकबाकीदार शेतकऱ्यांचे 550 कोटी 86 लाख रुपयांच्या कर्जमाफीची पूर्ण रक्कम संबंधित बँकेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. तर 28 हजार 716 चालू बाकीदार शेतकऱ्यांचे 40 कोटी 51 लाख रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी दिली आहे.

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ता. 31 मार्च 2018 पर्यंत कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील एक रक्कमी परतफेड योजनेच्या 17 हजार 958 लाभार्थी शेतकरी यांनी ता. 31 मार्च पूर्वी संबंधित बँकेशी संपर्क करून एक रक्कमी परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती जालन्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी दिली. 
 

 

Web Title: Jalna district's debt waiver of Rs. 956 crores 45 lacs