
Jalna : रेशीम कोषाचे कोसळले दर; अवकाळी पाऊस, गारपिटीचा रेशीम शेतीला फटका
उमेश वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
जालना - एप्रिल महिन्यात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीचा रेशीम शेतीलाही फटका बसला आहे. रेशीम कोष भिजल्याने बाजारात भाव कोसळले आहे. विशेष म्हणजे ही भाव घसरण जालना रेशीम कोष बाजारपेठेत नाही, तर कर्नाटक येथील रामनगर रेशमी कोष बाजारात ही भाव घसरले आहेत. परिणामी रेशीम कोषाला १५ हजार ते ४८ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.
जिल्ह्यात २०१८ मध्ये पहिली रेशीम बाजारपेठ जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून सुरू झाली आहे. या बाजारपेठेत जिल्ह्यासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह इतर भागातील शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्री येतात. या बाजारपेठेमुळे जिल्ह्यात रेशीम शेतीकडे असंख्य शेतकरी वळाले आहेत.
मात्र, यंदा रेशीम कोषाला म्हणावा तसा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच एप्रिल महिन्यात जिल्ह्यासह मराठवाड्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीचा रेशीम कोष निर्मितीवर ही परिणाम झाला आहे. त्यामुळे रेशीम कोषाची गुणवत्ता ढासळली आहे.
परिणामी रेशीम कोषाला भाव ही कमी मिळत आहे. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रेशीम बाजारपेठेत रेशीम कोषाला १५ हजार ते ४८ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेशीम शेती करणारे शेतकरी चिंतेत आहेत.
गतवर्षी ७५ हजार रुपये भाव
मागील वर्षी याच काळात जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रेशीम बाजारपेठेत रेशीम कोषाला सर्वाधिक ७५ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. तर सरासरी ५२ हजार ५०० व सर्वात कमी १५ हजार हजार रुपये क्विंटल भाव होता. गतवर्षी नऊ हजार ३७५ शेतकऱ्यांकडून ८३३ टन रेशीम कोषाचा आवक झाली होती. तर तब्बल ४३ कोटी ६१ लाखाची उलाढाल झाली होती.
एप्रिलपासून ११४ टन कोष खरेदी
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ता. एक एप्रिल २०२३ ते ता. दहा मे २०२३ या कालावधीत ११४ टन रेशीम कोषाची आवक झाली आहे. यातून पाच कोटी ४५ लाखांची उलाढाल झाली आहे. मात्र, यंदा सर्वाधिक ४७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून सर्वात कमी १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.
सध्या रेशीम धाग्याच्या भावामध्ये येणारा चढ-उतार व वातावरणातील बदलामुळे कोषाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या रेशीम कोषाचे दर कमी होत आहेत. भाव कमी झाल्याची स्थिती जालना रेशीम कोष बाजारपेठेसह कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू अशा सर्व बाजारपेठेत आहे.
- भरत जायभाये, फिल्ड ऑफिसर, रेशीम कोष कार्यालय, जालना