जालना : ‘नाफेड’ ची हरभरा खरेदी जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna farmer success in gram income production

जालना : ‘नाफेड’ ची हरभरा खरेदी जोरात

जालना : जिल्ह्यात नाफेडच्या अकरा केंद्रांपैकी दहा खरेदी केंद्रांवर मागील चार महिन्यात एक लाख २१ हजार ४०.२८ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. यंदा नाफेडकडून अंदाजे एक लाख ८० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी होण्याची शक्यता असून ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात यंदा सोयाबीन, उडीद, मूग, तुरीला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. मात्र, खुल्या बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्रांची वाट धरली. जिल्ह्यात नाफेडकडून पाच हजार २३० रूपये प्रतिक्विंटल हमीभावाने ता.१६ फेब्रुवारीपासून अकरा खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस सुरवात केली. नाफेडकडे तब्बल १२ हजार ५४ शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी केली आहे.

त्यापैकी नऊ हजार ४४५ जणांना नाफेडकडून हरभरा विक्रीसाठी घेऊन येण्याचे एसएमएस पाठविण्यात आल्याने आतापर्यंत नाफेडने अकरापैकी दहा खरेदी केंद्रावर आठ हजार ४९ शेतकऱ्यांनाकडून एक लाख २१ हजार ४०.२८ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. विशेष म्हणजे, यंदा नाफेडकडून एक लाख ८० हजार क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्टे ठेवले आहे. त्यामुळे नाफेडकडून अजून सुमारे ५९ हजार क्विंटल हरभरा खरेदी केला जाऊ शकतो. शिवाय ता.२९ मेपर्यंत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू राहणार आहे. परिणामी खुल्या बाजारातील हरभऱ्याचे दर अधिक खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा हरभराही शिल्लक राहण्याच्या मार्गावर असल्याने उत्पादक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गोदामात वाहने खाली होण्यास लागतो वेळ

नाफेडने खरेदी केलेला हरभार वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवला जात आहे. मात्र, हा हरभरा घेऊन जाणारी वाहने खाली होण्यास दोन दिवसांचा वेळ लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहने खाली होऊन येईपर्यंत खरेदी केंद्र बंद ठेवण्याची वेळ केंद्र चालकांवर येत असल्याचे चित्र आहे.

आठ हजार ४९ शेतकऱ्यांचा सहभाग

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथील खरेदी केंद्रावर एक हजार ७४७ शेतकऱ्यांकडून २७ हजार ३६४ क्विंटल, अंबड खरेदी केंद्रावर २६ शेतकऱ्यांकडून ३४४.५० क्विंटल, भोकरदनला एक हजार ५०९ शेतकऱ्यांकडून २१ हजार ९९७.५० क्विंटल, मंठा येथे एक हजार १३८ शेतकऱ्यांकडून १९ हजार ९९८.५० क्विंटल, परतूर येथे ८३० शेतकऱ्यांकडून १२ हजार ९१ क्विंटल, माहोरा येथे ७९६ शेतकऱ्यांकडून ११ हजार ५०५ क्विंटल, राजूर खरेदी केंद्रावर २७९ शेतकऱ्यांकडून तीन हजार ८२५.५० क्विंटल, अन्वा येथे ६४२ शेतकऱ्यांकडून आठ हजार १०६ क्विंटल, बदनापूर येथे ४८६ शेतकऱ्यांकडून सहा हजार ५३३ क्विंटल व आष्टी येथील खरेदी केंद्रावर ५९६ शेतकऱ्यांकडून नऊ हजार २७५.२८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.