जालना : डॉक्टर, कर्मचारी गायब...महिलेची आरोग्य केंद्रासमोरच प्रसूती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna health center

जालना : डॉक्टर, कर्मचारी गायब...महिलेची आरोग्य केंद्रासमोरच प्रसूती!

अंकुशनगर : प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता भर पावसात वडीगोद्री (ता.अंबड) प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रस्त्यावरच मातेची प्रसुती झाली. आरोग्य विभागाचा मनमानी कारभार रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील गरोदर माता रुपाली राहुल हारे यांना प्रसुती कळा येऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्षात आणले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यासह महिला आरोग्य सेविका गायब होत्या. त्यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी कोणीही नव्हते. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर आणताच रस्त्यावरच भर पावसात त्या मातेची प्रसुती झाली. प्रसुती झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना कल्पना दिल्यानंतर एक तास कोणीही आले नाही. एक तासभर गरोदर माता, बाळ व नातेवाईक भर पावसात उभे होते.

त्यानंतर खाजगी महिला डॉक्टर व परिचारिका यांनी येऊन पुढील उपचार केले. त्यानंतर माता व बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. माता व नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार माता आणि नवजात बालकाच्या जिवावर बेतणारा होता. त्यामुळे आता येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य केंद्राला लावले कुलूप

तळणी : मंठा तालुक्यातील दहिफळखंदारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर कर्मचारी हजर नसल्याने प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची आवारातच प्रसुती झाली. या कारणाने संतप्त नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दहिफळ खंदारे येथील ज्योती रामुजावळे ह्या महिलेला आरोग्य केंद्रात आणले. परंतु तिथे कोणीही हजर नसल्याने आवारातच प्रसुती झाली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी कुलुप ठोकले. मोहन म्हस्के , सुनीता म्हस्के यांनी जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत. तोपर्यंत कुलुप उघडणार नाही असा पवित्रा घेतला.

डॉक्टर व कर्मचारी नसल्याने माझ्या पत्नीची प्रसूती रस्त्यावर झाली. हा गंभीर प्रकार असून ड्युटीच्या वेळेत ड्युटीवर नसलेल्या डॉक्टर व कर्मचारी यांना निलंबित करा अन्यथा मी दवाखान्याला कुलूप ठोकणार आहे.

-राहुल हारे, महिलेचे पती, वडीगोद्री, ता.अंबड

डॉक्टर व कर्मचारी नसल्याने माझ्या पत्नीची प्रसूती रस्त्यावर झाली. हा गंभीर प्रकार असून ड्युटीच्या वेळेत ड्युटीवर नसलेल्या डॉक्टर व कर्मचारी यांना निलंबित करा अन्यथा मी दवाखान्याला कुलूप ठोकणार आहे.

-राहुल हारे, महिलेचे पती, वडीगोद्री, ता.अंबड