जालन्यात अवैध 'गर्भपात' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Illegal abortion Police seal private hospital

जालन्यात अवैध 'गर्भपात'

जालना : शहरातील ढवळेश्‍वर येथील राजुरेश्‍वर क्लिनिकमध्ये अवैध लिंगनिदान व गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्या आधारे जिल्हा शल्यचिकित्सक आणि चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी सापळा लावून पहाटे छापा टाकला. दरम्यान, या रुग्णालयात एक गर्भवती महिला, गर्भपाताच्या गोळ्या व स्त्री जातीचे भ्रूण आढळून आले. या क्लिनिकचा डॉ. सतीश गवारे फरार झाला. जिल्हा प्रशासनाने हे रुग्णालय सील केले.

शहरातील ढवळेश्‍वर येथे अवैध गर्भपात केला जात असल्याच्या तक्रारी पुणे येथील कुटुंब कल्याण कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांना देण्यात आली. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसले यांनी सापळा लावून एका गर्भवती महिलेस राजुरेश्‍वर क्लिनिकमध्ये लिंगनिदान करण्यासाठी पाठविले. मात्र, राजुरेश्‍वर क्लिनिकचा डॉ. गवारे याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसले यांनी आपल्या पथकासह चंदनझिरा पोलिसांसह या क्लिनिकवर शनिवारी पहाटे छापा टाकला.

यावेळी एका गर्भवती महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यासाठी भरती केल्याचे दिसून आले. शिवाय काही वेळात या महिलेचा गर्भपात होऊन स्त्री जातीचे भ्रूणही तेथे आढळून आले; तसेच गर्भपाताच्या गोळ्याही मिळून आल्या. डॉ. भोसले यांच्या तक्रारीवरून डॉ. गवारे, राजू पवार, एजंट संदीप गोरे, डॉ. पूजा विनोद गवारे, डॉ. प्रीती मोरे (रा. रामनगर), औषधी दुकान मालक स्वाती गणेश पाटेकर यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजू पवार याच्यासह तीन महिलांना ताब्यात घेतले.

१८ ते २० हजारांत गर्भपात

अवैध लिंगनिदान करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये घेतल जात होते. त्यानंतर

गर्भपात करण्यासाठी १८ ते २० हजार रुपये घेतले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ती महिला सुखरूप

छापा टाकलेल्या राजेश्‍वर क्लिनिक येथे एका महिलेचा गर्भपात झाला होता. या पथकाने याठिकाणी छापा टाकून त्या महिलेला तत्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. ती महिला सुखरूप आहे.