लालूच पडली महागात! लसणाच्या पिकात अफूची लागवड केल्याने शेतकऱ्याला जेलची हवा

farmer
farmer

बदनापूर (जालना): शिवारातील गट क्रमांक 91 मधील शेतात एका शेतकऱ्याने लसणाच्या पिकात अवैधरित्या अफूच्या झाडांची लागवड केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. तीन) रात्री बदनापूर व एलसीबीच्या पोलिस पथकाने छापा मारून उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी शेतात लागवड केलेली 24 लाख 5 हजार किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी (ता. चार) बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित शेतकऱ्याचे नाव  निवृत्ती गणेश शेवाळे असे असून तो स्वतः शेतकरी संघटनेचा जिल्ह्यातील बडा पदाधिकारी असल्याचे बोलल्या जाते. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निवृत्ती शेवाळे यांची चनेगाव शिवारातील गट क्रमांक 91 मध्ये शेती आहे. शेतात त्यांनी लसणाची लागवड केली आहे. मात्र त्यात आंतरपीक म्हणून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांचीही लागवड केली होती.

या संदर्भात गुप्त बातमीदारामार्फत बदनापूर पोलिसांना माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सक्षम अधिकारी तथा नायब तहसिलदार संजय शिंदे, सहाय्यक फौजदार इब्राहिम शेख, गजानन जारवाल, पोलिस मुख्य जमादार श्री. बुनगे, श्री. हरकळ, पोलिस नाईक श्री. काळूसे, पोलिस जमादार श्री. मोरे, श्री. दासर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नागवे, फौजदार श्री. राजपूत, पोलिस मुख्य जमादार श्री. हजारे, पोलिस जमादार श्री. तंगे, श्री. लोखंडे, श्री. जाधव, आयबाईक पथकाचे श्री. बोरकर, मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिटचे श्री. खलसे यांनी केली.

या कारवाईत पोलिसांनी 96 किलो 200 ग्रॅम वजनाची अफूची बोंडे असलेली झाडे जप्त केली. त्याची किंमत अंदाजे 24 लाख 5 हजार रुपये अशी आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या तक्रारीवरून संशयित निवृत्ती शेवाळे याच्या विरुद्ध अंमली औषधी द्रव्य आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे करीत आहे. या प्रकरणी संशयित निवृत्ती शेवाळे यांना अटक करून त्यास गुरुवारी बदनापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com