नगर पंचाईत...

नगर पंचाईत...

जालना - जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, जाफराबाद आणि मंठा या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. यानिमित्ताने या शहरांच्या विकासाला मोठी गती मिळेल असे वाटत होते; मात्र दोन वर्षांपासून नगरपंचायतींची अवस्था ग्रामपंचायतींसारखीच राहिलेली आहे. नवीन आकृतिबंधानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरली गेलेली नाहीत. हक्‍काचा मुख्याधिकारी कायमस्वरूपी मिळत नाही. नगरपंचायतीचा कारभार अजूनही दाटीवाटीने चालतो. अद्ययावत कार्यालयाची उभारणी झालेली नाही. विकासकामे करताना पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाचीही गैरसोय होते. 

मंठा : दोन वर्षांत दहा मुख्याधिकारी...
कृष्णा भावसार
मंठा - नगरपंचायतची स्थापना होऊन दोन वर्षे झाली. या दोन वर्षांच्या कालावधीत दहा मुख्याधिकारी झाले. मंजूर २९ पैकी २७ पदे रिक्त आहेत. परिणामी विकासात्मक कामे व नागरी सुविधा, महत्वाची कागदपत्रे आदी कामात विस्कळितपणा आला आहे.

दोन वर्षापूर्वी मंठा ग्रामपंचायतची नगर पंचायत झाली. आता नागरिकांना नागरी सुविधा व्यवस्थित मिळणार असे वाटत होते. परंतु पूर्वीचेच ग्रामपंचायतचे कर्मचारी नगरपंचायतला काम करीत आहेत. मंजूर २९ पैकी दोन पदे भरली असून २७ पदे रिक्त आहेत.  कर्मचारी कमी असल्याने नागरी सुविधा पुरविण्यास अडचणी येत असल्याचे मुख्याधिकारी केशव कानपुटे यांनी सांगितले. तर अभियंत्याचे पद रिक्त असल्याने नवीन बांधकाम परवाना, विकासात्मक कामाचे नियोजन करणे, अंदाजपत्रक, प्रस्ताव तयार करणे तसेच रस्ते, पाणीपुरवठा आदी तांत्रिक कामात अडचणी येत असल्याची माहिती नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांनी दिली. मंठा शहराकरिता बावीस सफाई कामगारांची गरज आहे. सध्या तात्पुरत्या मानधनावर १३ महिला व ४ पुरुष असे एकूण सतरा सफाई कामगार असून स्वच्छतेची काही कामे गुत्तेदारी पध्दतीने राबवीत असल्याचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे यांनी माहिती दिली.

ग्रामपंचायतीच्या इमारतीत कामकाज
ग्रामपंचायतच्या जुन्या इमारतीतच नगरपंचायतचे कामकाज सुरु आहे. ही इमारत अपुरी आहे. त्यामुळे कामकाज पाहताना गैरसोय होते. येथे नगरपंचायतीची नवीन अद्ययावत इमारत होणे गरजेचे आहे. 

व्यापारी संकुलाची दैना
याशिवाय शिवाजी चौक, नगरपंचायत कार्यालय, बाजार मैदान या ठिकाणी जुने व्यापारी गाळे आहेत. त्यांची दैना झालेली आहे. त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुलाचे प्रस्ताव तयार असून याबाबत लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे. यामुळे अनेकांना व्यवसायाकरिता जागा मिळणार आहे.

घनसावंगी : अधिकारी, कर्मचारीच मिळेनात
सुभाष बिडे 

घनसावंगी - नगरपंचायतीत कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर कामे खोळंबली असल्याचे चित्र आहे.

नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर प्रशासकीय संकुलात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांच्या जागेवर नगरपंचायत कार्यालय अस्तित्वात आले. येथे नगरपंचायतीच्या इमारतीसाठी शासनाकडून निधी एक कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मिळाला असून जुन्या जिल्हा परिषदेच्या जागेवर येथे इमारत करण्यात येणार आहे; मात्र कामास अजूनही प्रारंभ झालेला नाही.

नगरपंचायत घनसावंगी येथे लोकसंख्येच्या आधारांवर आकृतिबंधानुसार राज्यस्तरीय संवर्गातील २० व राज्यस्तरीय संवर्गातील पदाव्यतिरिक्त १३ असे एकूण ३३ पदांची मान्यता आहे. तरीही येथे केवळ कर निर्धारक म्हणून दोन जणांची नुकतीच बदलीवरून नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित कारभार ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी दोन, स्वच्छता कर्मचारी दोन, लिपिक दोन, शिपाई एक अशा सात; तसेच मानधन तत्त्वावर दोन कर्मचाऱ्यांद्वारे पाहिला जात आहे.

कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना
नगरपंचायतीची ४ एप्रिल २०१५ रोजी मान्यता मिळाल्यानंतर येथे तत्कालीन नायब तहसीलदार उद्धव नाईक यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जालना नगरपरिषदेचे दिलीप साळवे यांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान प्रभागरचनेत तफावत आल्यानंतर त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी अंबड येथील मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यांनी निवडणुकीनंतर पदभार सोडल्यानंतर जालना नगरपरिषदेचे कर निर्धारक केशव कानपुडे यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यानंतर तत्कालीन नायब तहसीलदार सी. एफ. मिरासे यांच्याकडे पदभार देण्यात आला. मुख्याधिकारी दिलीप खाटेकर यांची पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या काळात स्वच्छतागृहाचे मोठे काम उभे राहिले; मात्र त्यांनी रजेच्या नावावर पदभार सोडून विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करून घेतली. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर विक्रम मांडुरके यांनी पदभार स्वीकारला; मात्र मागील एक महिन्यापासून त्यांनीही रजा घेतली. आता दोन महिन्यांचा कालावधी होऊन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून हा पदभार पुन्हा एकदा अंबडचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरपंचायतीस नव्याने नियुक्त मुख्याधिकारी येत असतात; मात्र येथे कायमस्वरूपी न राहता ते पदभार सोडून देतात. त्यामुळे येथे अनुभवी मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करावी अशी मागणी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
- योजनाताई देशमुख,  नगराध्यक्षा, नगरपंचायत, घनसावंगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com