
Jalna News : कामावर हजर राहा! सरकारी संपकऱ्यांना प्रशासनाकडून आदेश
जालना : जुनी पेन्शनसाठी संपावर गेलेल्या जिल्ह्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाच्या निर्देशानुसार कामावर हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्याचे निर्देश बुधवारी (ता.१५) कार्यालयीन प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या नोटिसा कार्यालयाच्या बोर्डासह व्हॉट्सअपवर पाठविण्यात येत आहेत.
मागील दोन दिवसांपासून जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. शिवाय नागरिकांचे हाल होत आहे. संपकरी कर्मचारी ही आपल्या मागणीवर ठाम आहेत. राज्य शासनाकडून संपावर गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून संपकऱ्यांना नोटिसा देण्यास सुरवात केली आहे.
कार्यालयाच्या बोर्डावर तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्या व्हॉट्सअपवर पाठविल्या जाणार आहेत. या नोटिसांमध्ये, संपात सहभागी होणे ही गैरवर्तणूक असून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, शिवाय काम नाही, वेतन नाही, हे धोरण राज्य शासनाने अनुसरलेले आहे. या संपामुळे सेवेत खंड पडू शकतो, असे म्हटले आहे. त्यामुळे आता या नोटिसांनंतर तरी अधिकारी-कर्मचारी कामावर हजर होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत. प्रत्येक कार्यालयीन प्रमुखाला त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्याचे निर्देश दिले आहेत. या नोटिसा कार्यालयाच्या बोर्डावर व व्हॉट्सअपद्वारे संपकरी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत.
— केशव नेटके, निवासी जिल्हाधिकारी, जालना
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार आहे. नोटिसाच नाही तर बडतर्फ केले तरी मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार घेण्यात येणार नाही.
— ईश्वर गाडेकर, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना, जालना.