‘यिन’च्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सहकार्य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

जालना - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.

जालना - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छतेतून रोजगार’ उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ‘यिन’च्या शॅडो मंत्रिमंडळातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच श्री. लोणीकर यांची सदिच्छा भेट घेतली. यानिमित्त  ‘यिन’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी यिनचे अर्थमंत्री तेजस पाटील, राज्य महामंडळाचे अध्यक्ष अक्षय बर्गे, यिन ग्रामविकासमंत्री कल्याणी देशमुख, यिन पालकमंत्री आदित्य पवार, महामंडळाचे परमेश्वर इंगोले, साजिद शेख, प्रियांका पवार, जयश्री किंगरे यांची उपस्थिती होती. 

यिनच्या वतीने ‘स्वच्छतेतून रोजगार’ संकल्पनेतून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यभर एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे; तसेच पर्यटनस्थळाच्या ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून पिशवी, टोपले आदी साहित्यांची निर्मिती करून स्वच्छता अभियानासाठी याचा वापर केला जाणार आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी यिनचे व्यासपीठ उपयुक्त ठरले आहे. यिन पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान श्री. लोणीकर यांनी यिनच्या उपक्रमाचे आणि शॅडो मंत्रिमंडळाचे कौतुक केले. यिनच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  

उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र 
यिनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानासाठी स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने सर्व सहकार्य करणार आहे; तसेच स्वच्छता अभियान उपक्रमात सहभागी सदस्यांना राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देणार असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी म्हटले आहे.

Web Title: jalna news YIN babanrao lonikar