
जालना : जिल्ह्यातील आठ शाळांना राज्य मानांकन
जालना : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी पुरस्कार वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील आठ शाळांना राज्य मानांकन मिळाले, त्यांची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या समारंभाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, संजय येवते, उपशिक्षणाधिकारी बाबासाहेब खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील शाळांमधून स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी ३० शाळांची निवड करण्यात आली होती. गुणानुक्रमे ८ शाळांची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या शाळांना सन्मानित करण्यात आले.
राज्य पातळीवर निवड झालेल्या शाळांमध्ये किर्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अन्वी येथील संत भगवानबाबा आश्रमशाळा, दहिफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोकरदनची पायोनियर इंग्लिश सीबीएसई स्कूल, बदनापूरचे स्वामी दयानंद सरस्वती विद्यालय, जालन्याचे ऋषी विद्यामंदिर जालना, अंकुशनगरचे छत्रपती शिवाजी विद्यालय, जाफराबादच्या जिजाऊ प्राथमिक शाळेचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक श्रीकृष्ण निहाळ यांनी केले.
छत्रपती शिवाजी विद्यालयास दोन पुरस्कार
शहागड : अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयास स्वच्छतेचे दोन पुरस्कार प्राप्त झाले. यात जिल्हास्तरीय व उप जिल्हा पुरस्काराचा समावेश आहे. दरम्यान, जालना येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते मुख्याध्यापक किशोर डावकर, पर्यवेक्षक राजकुमार काकडे, प्रा. दिलीप तारडे,श्री.कोल्हे, आनंद शेळके, प्रा. अरुण कुलकर्णी, दिलीप नाटकर, सखाराम धनवडे, प्रभाकर वाघ आदींनी पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ पाणी ,व्यायामशाळा, संगणक कक्ष ,खेळांची मैदान, सुसज्ज स्वयंपाकगृह, ई लर्निंग ,सुसज्ज कार्यालय, वृक्षारोपण, सांस्कृतिक रंगमंच, बाल वाचनालय, पौष्टिक पोषण व पूरक आहार ,सुसज्ज स्वच्छतागृह ,प्रयोगशाळा असे विविध निकष पुरस्कारासाठी होते. दरम्यान, शाळेचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे, सचिव मनिषा टोपे, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. बाबासाहेब गायकवाड, कोषाध्यक्ष सुधाकर खरात आदींनी अभिनंदन केले आहे.
Web Title: Jalna State Ranking Of Eight Clean Schools In District Award Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..