Jalna : हजारो ऊसतोड मजूर कारखान्याकडे रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna

Jalna : हजारो ऊसतोड मजूर कारखान्याकडे रवाना

कुंभार पिंपळगाव : कर्नाटकासह पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने कोयत्याला चांगला भाव मिळत आहे यामुळे अनेक छोटे शेतकरी,शेतमजूर आता कारखान्याचा रस्ता धरू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापासून विविध तांडे आणि वस्त्यांवरून हजारो मजुर रवाना होत आहेत.यामुळे यंदाची दिवाळी अनेकांना उसाच्या फडावरचं साजरी करावी लागणार आहे.

मुकादमाकडून एकरकमी उचल घेवुन कारखान्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी आहे.परिसरातून विविध जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी हजारो मजुर जातात दिवसभर वाड्या,वस्त्या,तांड्यावर मजुरांची लगीनघाई सुरू आहे.मंगळवारी,बुधवारी मजुरांना निरोप देण्यासाठी कुटुंब,नातेवाईक विविध ठिकाणी रस्त्यावर थांबले होते. अनेक वाहणे भरून जात होती तर काही ठिकाणी मजुर मुलाबाळांना,वृध्द आई-वडिलांना सोडून जाताना हंबरडा फोडताना दिसत होती.शेकडो किलोमीटर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या मजुरांना आता फक्त फोनवरचं कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे.

यावर्षी कर्नाटक भागात दसऱ्यापासून गळीत हंगाम सुरू झाले, त्यामुळे अनेक मजुरांना दसऱ्यालाच घर सोडावे लागले. आता उरलेल्या कारखान्यांचे गळीत हंगाम तोंडावर आहेत, बॉयलर पेटलेले आहेत.या कारखान्यावर जाणाऱ्या मजुरांना दिवाळीचा सण फडावरच साजरा करावा लागणार आहे. गेल्यावर्षी अतिरिक्त उसामुळे मजुरांना हंगाम चांगला राहिला. शिवाय हंगाम सात-आठ महिन्यापर्यंत चालला याही वर्षी विविध भागात अतिरिक्त ऊस आहे.

कोयत्याचे दरही दोन लाख (जोडी) वर गेले आहेत. त्यामुळे अनेक छोटे शेतकरी,मजुर कारखान्याचे पैसे उचलून,देणे घेणे, मुलीबाळींचे लग्न आटोपून लोखंडी संदुकात संसार भरून गरजेपुरते धान्य,कपडे घेऊन व इतर वस्तु खरेदी करून मजुर ऊसतोडीसाठी विविध कारखान्यावर रवाना झाले आहेत. यामुळे तांडे,वाड्या, वस्त्यात शुकशुकाट जाणवू लागला आहे.वयोवृद्ध व मजुरांची लहान मुलेच घरी दिसत आहेत.