
Jalna News: गरिबांच्या फ्रीजला वाढली मागणी
कायगाव : सध्या तापमानात वाढ होताच गोदावरी नदी काठच्या कायगाव (ता.गंगापूर) परिसरात कारागिरांनी माठांची निर्मिती सुरू केली आहे.
गरिबाचे फ्रिज ओळखल्या जाणारा माठाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. फ्रिजपेक्षा माठातील पाणी उत्तम चविष्ट मानले जाते. आणि आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी पिणे हिताचे असल्याने माठ खरेदी करण्याकडे सर्वांचाच ओढा वाढल्याचे चित्र आहे.
जुने कायगाव ते गंगापूर रोडवर मुख्य रस्त्यालगत येथील चंद्रभान विटेकर, ज्ञानेश्वर विटेकर यांनी मातीची सर्वच प्रकारची भांडी तयार करण्याचे दुकान थाटले आहेत.
सद्यस्थितीमध्ये गोदावरी नदीच्या पोयटा मातीपासून उत्कृष्ट प्रकारचे माठ निर्मिती ते करण्यात मग्न आहेत. मातीच्या वस्तू बनविण्यासाठी गोदावरी, प्रवरा नदीकाठची माती विकत घेऊन कला कौशल्याने छान वस्तू तयार करीत आहेत. सध्या उन्हाळा असल्याने माठ, रांजण, गाडगे, केळी यांना मागणी वाढली आहे. पण नदीला पाणी असल्याने माती टंचाई समस्या भेडसावत आहे.
आहे त्या उपलब्ध मातीने माठ, रांजण तयार करून जागेवरच विक्री करण्यावर विटेकर कुटुंबीय भर देत आहे. दोनशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत किमतीचे रांजण येथे उपलब्ध आहेत. पानपोहीसाठी या रांजणांना मागणी वाढली आहे.
दररोज ते १७ माठ तयार करतात, असे त्यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. या उन्हाळ्यामध्ये किमान एक हजार ते बाराशे माठ विक्रीचे आपले उदिष्ट आहे.
त्या अनुषंगाने सद्यःस्थितीत पत्नी पदमाबाई व मुलगा ज्ञानेश्वर, सुनबाई रेखा यांच्या सहकार्याने माठ निर्मिती करण्यात संपूर्ण कुटुंब व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
येथे शंभर रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत किमतीचे माठ तयार केले जात असल्याचेही ते म्हणाले.
माठातील पाणी पिण्याचे फायदे
फ्रिजचे गार पाणी पिल्यास घसा दुखू शकतो. मात्र, माठातील पाण्याने टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत. उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे असून त्यातून शरीराला अनेक जीवनसत्त्वे, खनिजे मिळतात. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.रक्तदाब नियंत्रणात राहतो. मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने ती रोग दूर करते.
-डॉ.कृष्णा जाधव,कायगाव