
Jalna : व्हॅलेंटाइन डे’ला ‘दामिनी’चा दणका
जालना : शहरासह परिसरात मंगळवारी (ता.१४) व्हॅलेंटाइन डे’ साजरा झाला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह आढळलेल्या तब्बल १३ मुला-मुलींना दामिनी पथकाने नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, क्लासला दांडी मारून मित्रांसह नांदेडातून आलेल्या चार अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.१४) व्हॅलेंटाइन डे निमित्त दामिनी पथकाकडून शहरातील संभाजी महाराज उद्यान परिसर, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि विविध महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घालण्यात आली. या दरम्यान आक्षेपार्ह रितीने आढळलेल्या एकूण तेरा मुला-मुलींना दामिनी पथकाने नोटिसा बजावल्या.
शिवाय नांदेड येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये आयआयटीची तयारी करणाऱ्या चार अल्पवयीन मुली व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी मित्रांसोबत आल्या होत्या. या चार ही मुलींना रेल्वेस्थानक परिसरातून दामिनी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्या चौघी परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या असल्याचे पुढे आले.
दामिनी पथकाने जिंतूर येथून पालकांना बोलावून घेतले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलींना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक रंजना पाटील, सहायक फौजदार रवी जोशी, संजय गवळी, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी यांनी केली.