Jalna News : आधी पाण्यासाठी आक्रोश; सत्ता येताच विसर

आमदार गोरंट्याल यांची फडणवीसांवर टीका, काँग्रेसचे जालन्यात पाणी प्रश्नावर आंदोलन
Jalna News
Jalna Newssakal

Jalna News : जालना नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात आक्रोश आंदोलन केले होते. आता ते उपमुख्यमंत्री असताना धरणात, जलाशयात पाणी उपलब्ध असतानाही शहरातील नागरिकांना पंधरा ते वीस दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सत्तेत आल्यानंतर शहरातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था का केली असा सवाल आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना केला आहे.

शहरात पंधरा ते वीस दिवसाआड होत असलेला पाणी पुरवठा आणि शहरातील स्वच्छता प्रश्‍नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. दरम्यान, गुरूवारी (ता.२०) आमदार गोरंट्याल यांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी गटनेते गणेश राऊत, काँग्रेस शहराध्यक्ष शेख मेहमुद, दिनकर घेवंदे, माजी नगरसेवक रमेश गोरक्षक, पुनम स्वामी, महावीर ढक्का, महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Marathi News)

निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आमदार श्री. गोरंट्याल म्हणाले, की जालना शहराला कोणी वाली नाही. काँग्रेसची सत्ता असताना शहरात पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. आता मागील सव्वा वर्षांपासून नगरपालिकेत प्रशासक आहे.

स्वच्छतेचे कंत्राट दिल्यानंतर शहरातील कचरा उचलण्यात येत नाही. घंटागाड्यांमार्फत शहरातील कचऱ्याचे नियमित संकलन होत नाही. जायकवाडी धरण आणि घाणेवाडी जलाशयात सध्या पाणी उपलब्ध आहे.

असे असताना ही पालिका प्रशासनाकडून शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. शहरातील नागरिकांना पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही. पालिकेवर काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी शहरातील पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रोश आंदोलन करत मोठे-मोठे आश्‍वासने दिली होती.

आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना शहरातील नागरिकांना पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे. ते सत्ता आल्यानंतर पाण्याची व्यवस्था का करत नाहीत.

घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी ५० ते ६० वर्ष जुनी असल्याने पाण्याची मोठी गळती होत आहे. त्यामुळे घाणेवाडी ते जालना नवीन जलवाहिनीसाठी डीपीआर तयार करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. (Marathi Tajya Batmya)

शिवाय अंबड येथे ४५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव ही राज्य शासनाकडून पडून आहे. काही राजकीय मंडळी म्हणतात मुख्यमंत्री माझे मित्र आहे, ती राजकीय मंडळी पाणी पुरवठा मंत्र्यांशी जालन्याच्या पाणी प्रश्‍नावर कधी बोलले काय, स्वच्छता मंत्र्यांशी शहराच्या स्वच्छते संदर्भात बोलले काय असा सवाल करत शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडामोर्चा काढला जाईल, असा इशारा आमदार श्री. गोरंट्याल यांनी दिला आहे.

अंबड शहरामुळे जालन्यात पाणी प्रश्न

अंबड शहराला तीन एमएलडी पाणी देण्याचा करार आहे. मात्र, अंबड शहर सात एमएलडी पाणी घेत आहे. त्यामुळे अंबड नगरपालिकेकडून सात एमएलडीची २१ कोटी पाणी पट्टी कर होतो. शिवाय जालना नगरपालिकेने बसविलेले पाणी मीटर ही त्यांनी तोडून टाकले आहे. अंबड शहराचा पाणी पुरवठा झाल्यानंतर उरलेले पाणी जालना शहरासाठी येते.

जायकवाडी येथून पाणी उपशाचे दर महिन्याला ८० लाखांचे वीज बिल असून दरवर्षी दोन कोटी देखभाल दुरुस्तीसाठी खर्च येतो. त्यामुळे अंबड शहरातील जे लोक पाणीपट्टी भरत नाही, त्यांच्या सातबाऱ्यासह अंबड नगरपालिकेच्या मालकीच्या जागेच्या सातबाऱ्यावर जालना नगरपालिकेच्या नावे आले पाहिजे, असे ही आमदार श्री. गोरंट्याल यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com