प्रकल्पांतील जलपातळीत वाढती घट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

जालना - मागील चार वर्षांच्या दुष्काळानंतर गत पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे अनेक प्रकल्पांत जलसाठा राहिला; मात्र नियोजनाअभावी जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमध्ये सध्या केवळ 27.69 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये एक मध्यम तर आठ लघुप्रकल्पांमधील पाणीसाठा हा जोत्याखाली आहे, तर तब्बल सहा लघुप्रकल्प हे कोरडेठाक आहेत. दरम्यान यंदाही जिल्ह्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून भोकरदन तालुक्‍यात दोन, तर जाफराबाद तालुक्‍यात चार ठिकाणी टॅंकरद्‌वारे पाणीपुरवठा होत आहे. 

मराठवाड्यामध्ये मागील चार वर्षांपासून दुष्काळाचे चक्र सुरू आहे. याला जालना जिल्हाही अपवाद नाही. या दुष्काळामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभ्या मोसंबीच्या बागा जाळल्या होत्या. मागील पावसाळ्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली; मात्र पाण्याचे नियोजन झाले नाही. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. भोकरदन तालुक्‍यातील धामना मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित सहा मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 37.26 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे; तर सहा लघुप्रकल्प हे कोरडेठाक पडलेत, तर आठ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामुळे उर्वरित 43 लघुप्रकल्पांमध्ये 23.89 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील बरंजळा, प्रल्हादपूर, रेलगाववाडी साठवण तलाव; जाफराबाद तालुक्‍यातील चिंचखेडा, ढोलखेडा, शिंदी हे सहा लघुप्रकल्प कोरडेठाक आहेत; तर जालना तालुक्‍यातील नेर, बदनापूर तालुक्‍यातील सोमठाणा, भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव कोलते, पळसखेडा, जाफराबाद तालुक्‍यातील कोनड, भारज, मंठा तालुक्‍यातील पोखरी, वाई या आठ लघुप्रकल्पांचा पाणीसाठा हा जोत्याखाली आहे. 

टॅंकरचक्र सुरू 
यंदाही जिल्ह्यामध्ये टॅंकरचक्र सुरू राहणार आहे. भोकरदन तालुक्‍यामध्ये दोन तर जाफराबाद तालुक्‍यामध्ये चार टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाली आहे. पुढील काळामध्ये टॅंकरची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. 

यंदा स्थिती ठीक 
गतवर्षी या काळामध्ये जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के होता. यंदा 37.26 टक्के आहे. गतवर्षी पाच कोरडे तर दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली होते. यंदा केवळ एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहे. तर 57 लघुप्रकल्पांमध्ये गतवर्षी 1.14 टक्के पाणीसाठा होता. तो यंदा 23.89 टक्के आहे. तर 38 लघुप्रकल्प हे कोरडे तर 12 प्रकल्पांतील पाणीसाठा हा जोत्याखाली होता. त्या तुलनेत यंदा सहा कोरडे तर आठ लघुप्रकल्पांचा पाणीसाठा हा जोत्याखाली आहे. 

बाष्पीभवनामुळे घट 
दरम्यान मार्च महिना सुरू झाल्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत आहे. येत्या काळात उन्हाचा कडाका वाढल्यास बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होऊ शकते. 

Web Title: jalna water level decrease