
Jalna : पाय घसरून विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू
भोकरदन : विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेलेल्या युवकाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील क्षिरसागर येथे घडली. सुदर्शन (उर्फ विजय) शेषराव कोलते (२०) असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील क्षीरसागर येथील रहिवासी असलेला सुदर्शन हा युवक रविवारी सकाळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी स्वतःच्या विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेला होता.
मात्र, विहिरीला कठडे नसल्याने त्याचा अचानक तोल गेला व तो विहिरीत पडला. यादरम्यान जवळपास कोणी नसल्याने ही घटना कळायला वेळ लागला. काही वेळाने परिसरातील तरुणांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी लगेच आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी त्याला विहिरी बाहेर काढून भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येत असून, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे, पोलीस कर्मचारी समाधान जगताप, मिलिंद सुरडकर, इंदलसिंग बामनावत आदींनी ग्रामीण रुग्णालयात भेट देवून घटनेचा पंचनामा केला.
आई वडिलांना होता एकुलता एक..
सुदर्शन याचे शिक्षण पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत झाले होते. शिक्षणात देखील तो हुशार होता. वडिलांना आर्थिक आधार व्हावा म्हणून तो शहरातील एका चार्टर्ड अकाउंटंटकडे कामाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. विशेष म्हणजे तो आई वडिलांना एकुलता एक असल्याने या दुर्दैवी घटनेने आई वडिलांचा आधार हरवला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे