"जलयुक्तची' 463 कामे रखडली

हरी तुगावकर
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

लातूर - राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत अनेक कामे चांगली झाली असली, तरी जिल्ह्यात 2015-16 या वर्षाअंतर्गत मंजूर करण्यात आलेली 463 कामे वर्ष उलटले तरी सुरूच होऊ शकलेली नाहीत. ही कामे सुरू झाली असती तर यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे गावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असती. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली असून, आता जलयुक्तच्या कामात लोकसहभाग मिळतो की नाही, अशी भीती प्रशासनाला आहे.

पाच वर्षांत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेत पहिल्या वर्षी जिल्ह्यात 202 गावांची निवड करण्यात आली होती. यात अनेक चांगली कामे झाली आहेत. गेली तीन वर्षेलातूरकरांना दुष्काळात होरपळावे लागले आहे. त्यामुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. नदी, नाल्यांचे खोलीकरण मोठ्या प्रमाणात झाले; पण नदी, नाल्यांचे खोलीकरण हेच या योजनेतील एकमेव काम नव्हते. जलसंधारण व मृद्‌संधारणाच्या दृष्टीने इतरही कामे होणे गरजेचे होते. कृषी, जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे, स्थानिक स्तर, नरेगा, सामाजिक वनीकरण अशा विविध यंत्रणांकडून इतर कामे होणेही अपेक्षित होते; पण यंत्रणांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात 2015 मधील 463 कामे अद्याप सुरूच होऊ शकली नाहीत. त्यात यावर्षी जिल्ह्यात सरासरी बाराशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गावागावांतील तलाव, विहिरी, नद्या, नाले पाण्याने भरले आहेत. त्यात खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता रब्बीवर आहे. आता संबंधित यंत्रणांनी आता पुढाकार घेतला, तरी या कामांना लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही, याची भीती प्रशासनाला असून ही कामे रेंगाळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सुरू न झालेली कामे
जिल्ह्यात कंपार्टमेंट बंडिंग 154, समतल सलग चर चार, मातीनाला बांध 19, शेततळे 135, सिमेंट बंधारा 16, सिमेंट नाला बांधदुरुस्ती 26, लूज बोल्डर तीन, पाझर तलाव दुरुस्ती 14, सिमेंट बंधारा 57, सुरक्षा कुंपण चार, वृक्षलागवडीची 35 कामे वर्ष उलटले तरी सुरू होऊ शकलेली नाहीत.

Web Title: jalyukt shivar abhiyan work