जलयुक्त शिवार मोहीम थंडावली

हरी तुगावकर
सोमवार, 5 डिसेंबर 2016

एक हजार कामे अर्धवट; अति पावसामुळे प्रशासन, ग्रामस्थही सुस्तावले
लातूर - गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 या वर्षात मंजूर झालेली एक हजार कामे अद्याप अर्धवट अवस्थेतच आहेत.

जलयुक्त शिवार म्हणजे केवल नद्या, नाल्यांचे खोलीकरण असा समज झाल्याने इतर कामांकडे दुर्लक्ष झाले. यात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने आता या कामाला अडसर येत आहे. सध्या प्रशासन व ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे जलयुक्त शिवार मोहीम सध्या थंडावली आहे.

खोलीकरण म्हणजे जलयुक्त शिवार नव्हे
टॅंकरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही मोहीम सुरू केली आहे. यात नदी, नाल्यांच्या खोलीकरणासोबतच 32 प्रकारची विविध कामे करणे अपेक्षित आहे. यात कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, वनबंधारे, मातीनाला बांध, सिमेंटनाला बांध, शोषखड्डे, जलभंजन, वृक्ष लागवड, रोपवाटिका, ठिबक सिंचनावर भर, सिमेंटनाला बांध दुरुस्ती, तुषार सिंचनावर भर, विहिरी खोलीकरण, बोडी दुरुस्ती, कालवा दुरुस्ती अशा 32 कामांचा समावेश आहे; पण इतर कामांकडे फारसे लक्ष दिल्याचे दिसत नाही.

एक हजार कामे अर्धवट
जिल्ह्यात 2015-16 या वर्षात 202 गावांत सहा हजार 523 कामे मंजूर करण्यात आली होती. यापैकी लोकसहभागातून पाच हजार 407 कामे पूर्ण झाली आहेत. आता दुसरे वर्ष संपत आले तरी जिल्ह्यातील एक हजार 116 कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यात कंपार्टमेंट बंडिंगची 519, शेततळ्याची 133, सिमेंटनाला बांध 102, सिमेंट वळण बंधारा 157, गाव, साठवण तलावाची दुरुस्ती 70, नाला खोलीकरणाची 21, वृक्षलागवडीची 32, गॅबियन बंधाऱ्याची 19, सलग समतल चराची 15 अशी कामे अर्धवट अवस्थेत आहेत.

कामाचा वेग थांबला
या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी या मोहिमेतील कामांनी वेग घेतला होता; पण यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे कामाचे दृश्‍य परिणामही दिसू लागले आहेत; पण अर्धवट अवस्थेत असलेली कामे मात्र थांबली आहेत. पाणी भरपूर असल्याने प्रशासनाचे, तसेच ग्रामस्थांचे देखील या अभियानातून घेतल्या जाणाऱ्या इतर कामांकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी तरी ही कामे सुरू होतात की नाही याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: jalyukta shivar abhiyan slow