अमरावतीचे पथक करणार "जलयुक्त'ची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

हिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागाचे पथक लवकरच औरंगाबाद विभागात दाखल होणार आहे. हे पथक विभागातील आठ गावांतील कामांची तपासणी करणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध गावांमधून सिमेंट नालाबंधारे, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, तलावातील गाळ काढणे यांसह इतर जलसंधारणाची कामे केली जात आहेत. 2016-17 या वर्षात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधून कोट्यवधींची कामे झाली असून, त्यातून पाणीसाठा वाढला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावांचे मूल्यमापन करून एका गावाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वारेगाव, जालना जिल्ह्यातील लिंगस, बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना, लातूर जिल्ह्यात दावतपूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ, परभणी जिल्ह्यातील मरडसगाव, हिंगोली जिल्ह्यातील बाभूळगाव आदी गावांचा समावेश आहे.
Web Title: Jalyukta Shivar checking by Amravati Scoud