जलयुक्त शिवार जिल्ह्यात "थंड-थंड'

सुहास पवळ
सोमवार, 5 डिसेंबर 2016

बीड - राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 326 कामे हाती घेतली होती. मात्र, वर्ष होऊनही ती पूर्ण होऊ शकली नाहीत. शिवाय यावर्षी या अभियानांतर्गत 256 गावांची निवड झाली. पण, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 130 गावांमध्येच कामांना सुरवात झाली असून अजूनही तब्बल 126 गावांमध्ये एकही काम अद्यापपर्यंत हाती घेण्यात आले नाही. एकूणच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलयुक्त अभियान थंडावले असल्याचे चित्र आहे.

बीड - राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 326 कामे हाती घेतली होती. मात्र, वर्ष होऊनही ती पूर्ण होऊ शकली नाहीत. शिवाय यावर्षी या अभियानांतर्गत 256 गावांची निवड झाली. पण, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 130 गावांमध्येच कामांना सुरवात झाली असून अजूनही तब्बल 126 गावांमध्ये एकही काम अद्यापपर्यंत हाती घेण्यात आले नाही. एकूणच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलयुक्त अभियान थंडावले असल्याचे चित्र आहे.

या अभियानांतर्गत यंदा 256 गावांची निवड करण्यात आली. यांतील 130 गावांमध्ये जलयुक्तची एकूण 625 कामे हाती घेण्यात आली आहेत. यांपैकी 459 कामे पूर्ण झाली असून, 166 कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. ही 625 कामे पूर्ण झाल्यानंतर याचा फायदा तब्बल तीन हजार 402 हेक्‍टर क्षेत्राला होणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यामध्ये बांधबंदिस्तीच्या 44 कामांचा समावेश असून, यांतील 26 कामे पूर्ण झाली आहेत; तर 18 कामे प्रगतीवर आहेत. याशिवाय सलग समतल चर खोदण्याची 97 कामे, मातीनाला बांध उभारणीची 48 कामे, सिमेंट नाला बंधाऱ्याची 75 कामे, फेरभरण चर/जलशोषक चर खोदण्याची पाच कामे, ठिबक सिंचनाची 186 कामे, तुषार सिंचनाची 22 कामे, सिमेंट नाला बंधारा दुरुस्तीची सात कामे, पाझर तलाव दुरुस्तीची नऊ कामे, कोल्हापुरी बंधारा दुरुस्तीची सात कामे, मातीनाला बंधारा दुरुस्तीची बारा कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची 94 कामे तर गाळ काढण्याच्या 19 कामांचा यामध्ये समावेश आहे. या कामांवर आतापर्यंत आठ कोटी 15 लाख 46 हजार रुपये खर्च झाला आहे.

गतवर्षी 151 कोटींची झाली कामे
गतवर्षी जलयुक्त शिवार अंतर्गत तब्बल सहा हजार 834 कामे सुरू करण्यात आली. यापैकी सहा हजार 508 कामे पूर्ण झाली; तर 326 कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. पूर्ण झालेल्या साडेसहा हजार कामांमुळे तब्बल 44 हजार 756 हेक्‍टर क्षेत्राला फायदा मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या सर्व कामांवर वर्षभरात तब्बल 150 कोटी 90 लाख 88 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. या तुलनेत यावर्षी आतापर्यंत जलयुक्त कामांवर केवळ 8 कोटी 15 लाख इतकाच निधी खर्च झाल्याने जलयुक्त कामांचा वेग यंदा मंदावल्याचे बोलले जात आहे.

55 कोटींचे अद्याप वाटपच नाही
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गतवर्षी मोठ्या प्रमाणावर कामे झाली असली तरी अनेक कामांची बिलेच कंत्राटदारांना वाटप केली गेली नसल्याचे समोर आले आहे. शासनाकडून आलेला सर्व निधी संबंधित यंत्रणांना वाटप केला गेला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कामे पाहणाऱ्या यंत्रणांकडून कामे पूर्ण होऊनही अनेक कंत्राटदारांना त्यांची बिले अदा केली नसल्याचे बोलले जात आहे. जवळपास 55 कोटींची बिले कामे होऊनही अदा केली नसल्याचे समोर आले आहे.

यावर्षीच्या जलयुक्त कामांचा आढावा
कामाचे नाव-एकूण सुरू कामे-पूर्ण कामे-प्रगतीवर कामे-झालेला खर्च-
बांधबंदिस्ती-44-26-18-36.50 लक्ष-
सलग समतल चर खोदणे-97-50-47-1 कोटी 12 लक्ष 58 हजार-
मातीनाला बांध-48-48-00-1 कोटी 32 लक्ष 92 हजार-
सिमेंट नाला बंधारा-75-46-29-3 कोटी 41 लक्ष 58 हजार-
फेरभरण चर खोदणे-5-5-00-9.89 लक्ष-
ठिबक सिंचन-186-186-00-74.33 लक्ष-
तुषार सिंचन-22-22-00-2.53 लक्ष-
सिमेंट बंधारा दुरुस्ती-7-3-4-4.14 लक्ष-
पाझर तलाव दुरुस्ती-9-1-8-2.98 लक्ष-
कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती-7-3-4-11.75 लक्ष-
मातीनाला बांध दुरुस्ती-12-12-00-10.93 लक्ष-
नाला खोलीकरण-94-52-42-53.05 लक्ष-
गाळ काढणे-19-5-14-22.28 लक्ष-
एकूण-625-459-166-8 कोटी 15 लक्ष 46 हजार-

Web Title: jalyukta shivar scheme