फुलंब्री तालुक्यात सर्वात जास्त खोलीकरण

नवनाथ इधाटे
सोमवार, 11 जून 2018

तालुक्यात सार्वजनिक हिताचे कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने विकासाची चिंता न करता आता आपल्या शेतीच्या कमीत कमी क्षेत्रात नवनवीनतंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रयत्न करावा. पूर्वी शाळेत मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या जास्त असायची. त्यात शासकीय नोकरीत देखील जास्त मुले असायचे.

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात सर्वात जास्त नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झाले आहे.  फुलंब्रीच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात कुठेच एवढ्या प्रमाणात खोलीकरण झाले नसल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे केला आहे. वारेगाव (ता.फुलंब्री) येथे शाळा वर्ग खोल्यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता.10) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, औरंगाबादचे उपमहापौर विजय औताडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामुआण्णा नवपुते, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण, शिवाजी पाथ्रीकर, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती एकनाथ धटिंग, वारेगावच्या सरपंच उज्ज्वला बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

पुढे बोलतांना बागडे म्हणाले की, तालुक्यात सार्वजनिक हिताचे कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने विकासाची चिंता न करता आता आपल्या शेतीच्या कमीत कमी क्षेत्रात नवनवीनतंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रयत्न करावा. पूर्वी शाळेत मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या जास्त असायची. त्यात शासकीय नोकरीत देखील जास्त मुले असायचे. परंतु अलीकडच्या काळात हे समीकरण बदलले आहे. आता उच्च शैक्षणिक क्षेत्रात मुली मुलांच्या तुलनेत पुढे आहे. त्यामुळे शासकीय नोकरी करणाऱ्या मुलींची संख्या देखील वाढत आहे. पुरुषांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. नसता पुढील काळात महिलांचे घरकाम करण्याची वेळ पुरुषांवर येऊ शकते. त्यामुळे मुलांनी शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजेत.

तालुक्यात सार्वजनिक हिताच्या कामाची चिंता करण्याची गरज शेतकऱ्यांना राहिलेली नाही. कारण तालुक्यात जलयुक्त शिवार, फुलंब्री पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना सर्वात जास्त 450 विहिरी दिल्या, ठिबक सिंचनासाठी अनुदान, पीक विमा, बोंडअळीग्रस्त नुकसान केलेल्या कापूस पिकाची नुकसान भरपाई, कर्जमाफी, गावागावात सार्वजनिक सभागृह, ड्रेनेजलाइन, गावागावातील रस्ते, बंद नलिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी. तसेच शेतकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनेचा फायदा वेळेत घेतला तर कुठल्याही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची किंवा आत्महत्यांच्या विचारदेखील मनात येणार नाही. यावेळी बाजार समितीचे तज्ञ संचालक विलास उबाळे, विकास गायकवाड, पंचायत समिती सदस्य संजय त्रिभुवन, नरेंद्र देशमुख, अप्पासाहेब काकडे, गजानन नागरे, हौसाबाई काटकर, वैशाली चोपडे, बाळासाहेब तांदळे बाळासाहेब सोटम, राम बनसोड, कैलास सोनवणे, गणेश बोरसे, सुचित बोरसे, नरेंद्र बोरसे, हसन देशमुख, शेषराव जाधव, कैलास सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र देशमुख यांनी केले. 

Web Title: jalyukta shivar work in phulambri