महावितरणकडून आता जंबो बिलिंग सिस्टीम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीजग्राहकांच्या बिलाची छपाई व वितरण मुंबईच्या मुख्यालयातून सुरू करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच असा नावीन्यपूर्ण जंबो प्रयोग केला जात आहे. 

औरंगाबाद - राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीजग्राहकांच्या बिलाची छपाई व वितरण मुंबईच्या मुख्यालयातून सुरू करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच असा नावीन्यपूर्ण जंबो प्रयोग केला जात आहे. 

वीजग्राहकांना वीजबिलाचे वेळेत व अचूक वीजबिल मिळावे; तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा, यासाठी बिलाचे केंद्रीकरण केल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी साधारण सात ते आठ दिवसांचा अवधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्वरित देयक प्रदान तारखेअंतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सीजद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. 

या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्या वतीने केंद्रीय पद्धतीने वीजबिलाची छपाई व वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबाईल मीटर रीडिंग ऍपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम) मीटर वाचन; तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत-जास्त अचूक वीजबिल मिळेल; तसेच त्यांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळाल्यामुळे वीजबिल भरणा केंद्रांतील रांगा कमी होतील व देयक भरणे अधिक सोयीचे होईल, असा दावा करण्यात आला आहे. यापुढे मुख्यालयातील सर्व्हरवर बिल तयार करण्यात येणार असून, हे बिल परिमंडलस्तरावर वीजबिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीकडे चोवीस तासांत पाठविण्यात येईल. त्यानंतर या एजन्सीकडून सदर वीजबिल शहरी भागात 48 तासांत आणि ग्रामीण भागात 72 तासांत वितरित करण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबिल न देणाऱ्या एजन्सीजना दंड आकारण्यात येणार आहे.

Web Title: Jambo Billing System Now From MSEB