दानवे म्हणतात, "जनधन' खात्यांत पाच हजार जमा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

जालना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक खात्यात पाच हजार रुपये जमा केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले आणि उपस्थितांना "धक्का' दिला. प्रत्यक्षात जनधन खात्यात सरकारकडून एक दमडीही जमा करण्यात आलेली नाही. 

वेगवेगळ्या विधानांमुळे दानवे अधूनमधून चर्चेत असतात. पैठण येथे पालिका प्रचारसभेत "लक्ष्मीदर्शन'संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. 28) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी (ता. 29) येथील एका कार्यक्रमात त्यांनी "जनधन'संदर्भात वेगळीच माहिती देऊन टाकली. 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची येथे आज सुरवात झाली. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. दानवे बोलत होते. ते म्हणाले, की देशातील गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोदी यांनी पहिली योजना सुरू केली ती जनधन. या योजनेअंतर्गत 40 टक्के नागरिकांचे बॅंकांत खाते उघडले. मात्र या खात्यात पैसे नव्हते. त्यामुळे जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी खाते उघडले, अशा खात्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाच हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे ज्यांनी खाते उघडले नाही, त्यांनी बॅंकेत जावे. बॅंक मॅनेजरने जर खाते नाही उघडून दिले तर मला फोन करावा. खाते उघडून देण्यासाठी मी मदत करतो. आता यापेक्षा काय करायला हवं? 

दरम्यान, जनधन योजनेअंतर्गत नागरिकांनी बॅंकांत खाती उघडली आहेत. त्यातील अनेक खाती तर उघडल्यापासून व्यवहाराअभावी तशीच पडून आहेत. नोटाबंदीनंतर देशात ठिकठिकाणी अशा खात्यांत पैशांचा पूर आल्याच्या वार्ता चर्चेचा विषय बनल्या. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर जनधन खात्यांत सरकारकडून एक दमडीही जमा करण्यात आलेली नाही. या जनधन खात्यांमध्ये सरकार पैसे जमा करेल, अशी नागरिकांना आशा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदारही असलेले दानवे मात्र जनधन खात्यांत मोदींनीच पाच-पाच हजार जमा केल्याचे सांगून मोकळे झाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा उपस्थितांना "धक्का' किंवा आश्‍चर्य वाटले असले तरी खातेदारांत मात्र थट्टा केल्याची भावना रुजण्याची शक्‍यता आहे आणि कार्यक्रमानंतर तशी चर्चाही सुरू झाली आहे. 

"लक्ष्मीदर्शन'प्रकरणी गुन्हा 
औरंगाबाद ः "लक्ष्मीदर्शन'संदर्भात वक्तव्याप्रकरणी श्री. दानवे यांच्याविरुद्ध पैठण येथील पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा (एफआयआर) दाखल झाला. राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. पालिका निवडणुकीदरम्यान पैठण येथे 17 डिसेंबरला झालेल्या प्रचारसभेत दानवे यांनी "मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या दारी लक्ष्मी आली तर नकार देऊ नका, लक्ष्मीचा स्वीकार करा,' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आयोगाच्या आदेशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक अशोक गिरी तपास करीत आहेत. 

Web Title: jan dhan accounts deposit five thousand