जनसेवा क्रेडिट सोसायटीची बारा राज्यांत बिनव्याजी बॅंकिंग सुविधा

जनसेवा क्रेडिट सोसायटीची बारा राज्यांत बिनव्याजी बॅंकिंग सुविधा

महाराष्ट्रात 18, देशात 31 शाखा, देशात 20 हजारांपेक्षा अधिक सभासद

औरंगाबाद - इस्लाम धर्मात व्याज देणे आणि घेण्याला थारा नाही. व्याजाचे व्यवहार निषिद्ध मानले गेल्याने इस्लामिक राष्ट्रात बिनव्याजी व्यवहार करणारी इस्लामिक बॅंकिंग व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. अशीच बिनव्याजी बॅंकिंग सुविधा "जनसेवा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.'च्या माध्यमातून देशात दिली जात आहे. या सोसायटीच्या देशातील बारा राज्यांत 31 शाखा असून, त्यांचा टर्नओव्हर 200 कोटींपेक्षा अधिक आहे.

येथील सर्व व्यवहार बिनव्याजी होत असून, गोल्ड लोन, कर्ज सुविधा, वाहनांवर फायनान्स बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाते. औरंगाबाद शहरातील सिटी चौकात "जनसेवा'ची शाखा असून, येथील शाखेचा वार्षिक टर्नओव्हर 20 कोटींपेक्षा जास्त आहे. या सोसायटीमध्ये बॅंकेप्रमाणे अधिकाधिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. अल्पसंख्याक समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती करणे, त्यांना इस्लाम धर्माच्या शिकवणीप्रमाणे व्याजापासून दूर ठेवणे हा या सोसायटीचा उद्देश आहे.

मुंबईत स्थापना
जनसेवा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 15 मार्च 2010 मध्ये मुंबईत नोंदणी करण्यात आली. याचे चीफ प्रमोटर डॉ. रहेमतुल्लाह अब्दुल आहाद आहेत. मुंबईत स्थापना झाल्यानंतर हळुहळु राज्यात या सोसायटीच्या शाखांचा विस्तार करण्यात आला. आज महाराष्ट्रासोबत, आंध्र प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्‍चिम बंगाल राज्यांत या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत.

महाराष्ट्रात 18 शाखा, औरंगाबादेत 2011 मध्ये सुरवात
जनसेवा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत 18 शाखा सुरू आहेत. औरंगाबादेत या सोसायटीची 2011 मध्ये स्थापना झाली. सुरवातीला केवळ 13 सभासद, एक लाख 30 हजारांचे भांडवल होते. आज औरंगाबादेत सोसायटीचा वार्षिक टर्नओव्हर 20 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. इस्लामच्या शिकवणीनुसार येथे बिनव्याजी व्यवहार, कर्ज सुविधा दिली जात असल्याने सोसायटीला दरवर्षी प्रतिसाद मिळतो. औरंगाबादेत सोसायटीचे सध्या एक हजार 743 सभासद आहेत. मराठवाड्यात सोसायटीच्या औरंगाबादसह परभणी, लातूर येथे शाखा आहेत.

विविध कारणांसाठी बिनव्याजी कर्ज
या सोसायटीच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील शाखेने आतापर्यंत एक कार, पाच रिक्षा, 175 दुचाकींसाठी बिनव्याजी फायनान्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सभासदाला गाडीसाठी फायनान्स केल्यावर त्याला प्रत्येक महिन्याला गाडीच्या किंमतीनुसार हप्ते भरावे लागतात. याशिवाय व्यवसायासाठीही येथे कर्ज दिले जाते. अनेक जण आपल्या गरजेनुसार कर्ज घेतात. मात्र, कर्ज घेताना कर्जदाराला सोने सोसायटीकडे ठेवावे लागते. औरंगाबादमधील शाखेने आतापर्यंत 1100 जणांना गोल्ड लोन दिलेले आहे. साधारणतः 30 हजारांचे गोल्ड लोन घेतले तर दहा महिन्यांच्या समान हप्त्यात त्याची फेड करावी लागते. यासाठी प्रत्येक महिन्याला 150 रुपये सर्व्हिस चार्ज म्हणून घेतले जातात. शिवाय सोसायटीकडून पिग्मी कलेक्‍शनही केले जाते. औरंगाबादेत सोसायटीचे अध्यक्ष ऍड. सय्यद फैज, खजिनदार सय्यद आझम अली, सचिव मो. अब्बास अन्सारी, बोर्ड सदस्य शाएक मतीन, मो. जुबेर तर शाखा व्यवस्थापक शेख अहेमद आहेत. शाखेत एकूण पाच कर्मचारी आहेत.

पॉईंटर
-देशात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे टर्नओव्हर
-औरंगाबाद शाखेचे 20 कोटींचे टर्नओव्हर
-शाखांतून बिनव्याजी कर्ज सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com