जपानी पर्यटकांना धरले वेठीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ पाहण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांना वेठीस धरण्याचे धोरण पोलिसांनी सुरू केले आहे. शनिवारी (ता. एक) पोलिसांनी जपानी पर्यटकांची बस तब्बल ४५ मिनिटे अडवून धरली. बस शहरात आलीच कशी? असा सवाल करीत पोलिसांनी विदेशी पर्यटकांसमोर कार्यतत्परतेचे ओंगळ दर्शन घडवले.  

औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ पाहण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांना वेठीस धरण्याचे धोरण पोलिसांनी सुरू केले आहे. शनिवारी (ता. एक) पोलिसांनी जपानी पर्यटकांची बस तब्बल ४५ मिनिटे अडवून धरली. बस शहरात आलीच कशी? असा सवाल करीत पोलिसांनी विदेशी पर्यटकांसमोर कार्यतत्परतेचे ओंगळ दर्शन घडवले.  

प्रशासकीय पातळीवर पर्यटनाबद्दलची अनास्था आहे. त्यामुळे पर्यटकांचे प्रमाण कमी झालेले असतानाच उरल्यासुरल्या पर्यटकांनाही पोलिस वेठीस धरत आहेत. शनिवारी विदेशी पर्यटकांची एक बस अजिंठा लेणीचे दर्शन घडवून, पर्यटकांना एका हॉटेलात सोडण्यासाठी निघाली होती. या बसला वाहतूक पोलिसाने अमरप्रीत चौकात अडवले. सोळा जपानींसह वीस ते पंचवीस पर्यटक बसमध्ये होते. 

खासगी बसला बंदी असताना, बस शहरात आलीच कशी, असा सवाल करत तब्बल पाऊण तास बस रोखून धरली. वाहतूक कोंडी आणि वाईट रस्त्यांतून वाट काढत पर्यटक अजिंठा येथून आले होते. त्याचप्रमाणे दुसरी एक बस विमानतळावरून पर्यटकांना हॉटेलात सोडून येत असताना क्रांती चौकात अडवून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

का केली कारवाई? 
तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात खासगी बसला बंदी घातलेली आहे; मात्र त्यांनी पर्यटकांच्या टुरिस्ट लिहिलेल्या वाहनांना शहरात पर्यटकांना आणण्याची मुभा दिली होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची वाहने अडवून पोलिस विदेशी पर्यटकांसमोर खाबूगिरीचे दर्शन घडवत असल्याचे चित्र आहे. ट्रॅव्हल्स बसला शहरात बंदी असल्याचे कारण सांगून पोलिस कारवाई करीत आहेत. 

ट्रॅव्हल्स बसला जालना रस्त्यावर बंदी आहे. टुरिस्ट असतील तर त्यांनी एसीपी कार्यालयाकडून रोज परवानगी घेणे अपेक्षित आहे. रोज परवानगी घेता येत नसेल तर पोलिस आयुक्‍तांच्या अधिसूचनेला आव्हान दिले पाहिजे. 
- भारत काकडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

व्यावसायिक अडचणीत 
शहरात पर्यटकांची वाहतूक करणारी दहा ते पंधरा वाहने आहेत. ही सर्व वाहने पर्यटकांची सोय करून देत असताना, पोलिस या वाहनांना त्रास देत आहेत. पर्यटकांच्या वाहनासाठी शहरात येण्याची परवानगी रोज घेतली जावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुळात पर्यटक केव्हा येणार हे निश्‍चित नसते, ते आल्यानंतर त्यांना सेवा मिळणे आवश्‍यक आहे. सरसकट त्रास देण्याच्या पोलिसांच्या धोरणामुळे टुरिस्ट व्यावसायिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

काय करता आले असते...
आरटीओ कार्यालयात पर्यटकांच्या वाहनांसाठी तीन महिन्याला साधारण ६५ हजार रुपयांचा जबर कर भरावा लागतो. परवाना असलेली ही वाहने ‘टुरिस्ट’ संवर्गात मोडतात. तरीही पोलिस त्यांना सामान्य ट्रॅव्हल्सप्रमाणे वागणूक देत आहेत. विदेशी पर्यटकांची बस पकडल्यानंतर अडवून ठेवण्याऐवजी वाहनांचा क्रमांक नोंदवून नंतरही कारवाई करता आली असती.

Web Title: Japan Tourist Police Crime