महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर जावडेकरांचे मौन

jawdekar
jawdekar

नांदेड :  महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मी काही भाष्य करणार नाही, असे सांगून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलण्याचे टाळले. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याविषयी विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.


श्री गुरुनानक देवजी यांची ५५० वी जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १२) नांदेडला मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्‍घाटन श्री. जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपण महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर वक्तव्य करणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेकडील अवजड उद्योग हे खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याबद्दल विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. मी नांदेडला धार्मिक कार्यक्रमासाठी आलो असून मी राजकीय घडामोडीवर इथे काही बोलणार नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.


दरम्यान, प्रदर्शनीच्या उद्‍घाटनानंतर श्री. जावडेकर यांनी जगाला एक ओंकारचा संदेश देणारे श्री गुरुनानक देवजी हे महान व्यक्ती होते. आपण सर्वप्रथम मानव आहोत, आपल्या सर्वांचा पालनकर्ता एकच असून आपआपसातील मतभेद दूर करुन प्रेमाने, शांततेने रहावे, असा संदेश त्यांनी दिला असल्याचे सांगून त्यांनी जगाला दिलेला संदेश आज ५५० वर्षी प्रकाशपर्व म्हणून आपण सर्वजण साजरे करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारपूर कॅरीडॉरचे महत्व ओळखून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली व एक चांगले काम झाले. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा संदर्भातही लवकरच एक फिल्म बनविण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


नांदेडला मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेली ही प्रदर्शनी ता. १८ नोव्हेंबरपर्यंत पाहण्यासाठी सर्वांनी खुली ठेवण्यात आली आहे. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे पच्शिम विभागाचे महासंचालक आर. एन. मिश्रा, भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्यासह मुख्य सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर श्री. जावडेकर यांनी प्रदर्शनीची पाहणी केली तसेच त्यानंतर त्यांनी नांदेडच्या मुख्य सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी शिरोपाव आणि तलवार देऊन गुरुद्वारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com