जवान किरण थोरात यांच्यावर आज अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पालखेड/वैजापूर - जम्मू-काश्‍मीरमधील कृष्णाघाटी भागात शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करी जवान किरण पोपटराव थोरात (वय ३१) हुतात्मा झाले. फकिराबादवाडी (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) या मूळ गावी शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. 

शेतकरी कुटुंबातील किरण यांनी शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार वाटचाल करून ते सैन्यदलात दाखल झाले. काश्‍मीरच्या कृष्णा घाटी भागात पाकिस्तानी जवानांनी बुधवारी (ता. ११) केलेल्या गोळीबारात किरण गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

विमानतळावर मानवंदना
हुतात्मा जवान किरण थोरात यांचे पार्थिव आज सायंकाळी सहाला लष्कराच्या विमानाने चिकलठाणा विमानतळावर आणण्यात आले. तेथे त्यांना १६९ मीडियम रेजिमेंटच्या सैनिकी तुकडीने मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव छावणीतील लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, ब्रिगेडियर डी. के. पात्रा, कर्नल डी. के. राणा, कॅप्टन शेख रहेमन अली, कॅप्टन साकेत शर्मा यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

Web Title: jawan kiran thorat funeral