जायकवाडी धरण मृतसाठ्यातून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जलविद्युत केंद्र आजपासून सुरू
जायकवाडी धरणावर असलेले जलविद्युत केंद्र धरणात पाणी नसल्यामुळे चार महिन्यांपासून बंद पडले होते; परंतु आता जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे हे केंद्र गुरुवारपासून (ता.एक) सुरू होईल, अशी माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.  विद्युत केंद्रासाठी सोडण्यात येणारे पाणी गोदापात्रात सोडण्यात येते. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये; तसेच जनावरे, वाहने किंवा कोणतीही मालमत्ता नदीपात्रात ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे श्री. सावंत यांनी केले.

पैठण - दुष्काळी परिस्थितीमुळे मृत जलसाठ्यात गेलेले जायकवाडी धरण अलीकडच्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या पुराच्या पाण्यामुळे मृतसाठ्यातून बाहेर आले आहे. यामुळे आता त्यानंतर बुधवारपासून (ता.३१) धरणाच्या पाणीपातळी वाढीला सुरवात होणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे तब्बल दोन महिने पाण्याअभावी व दररोजच्या वापरामुळे धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस घटत गेली. आता तरी पाऊस येईल अशी आशा बाळगून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, नागरिक बसले होते; परंतु तब्बल दोन महिने पावसाने फटका दिल्याने उपलब्ध पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेवटी धरणाचा पाणीसाठा मृतसाठा म्हणून घोषित करण्यात आला.

त्यामुळे आता पहिल्यांदा मृतसाठ्यातून बाहेर पडण्यासाठी दाखल झालेले पाणी उपयोगी पडले आहे. यापुढे दाखल होणारे पाणी धरणाची पातळी वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतरच ओलिताखाली येणाऱ्या पाणीसाठ्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. दरम्यान, मृतसाठा जिवंत झाल्यामुळे पैठणचे तहसीलदार महेश सावंत, कार्यकारी अभियंता सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, अभियांत्रिकी सहायक राजाराम गायकवाड यांनी धरणाची पाहणी करून जलपूजन केले. 

धरणात १३ टक्‍क्‍यांनी वाढ 
जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या दाखल झालेल्या पाण्यामुळे धरणाची पाणीपातळीत मृत जलसाठ्यासह आतापर्यंत एकूण १३ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. त्यानंतर झालेल्या वाढीमुळे बुधवारी अडीच टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी दिली.

धरणाच्या पाण्याची सकाळी सात वाजता ४२ हजार ४६९ क्‍युसेक, अकरा वाजता आवक वाढल्याने ५१ हजार ५१० क्‍युसेस, दोन वाजता ४७ हजार २४६ क्‍युसेक व दुपारी चार वाजता ४५ हजार ४१८ अशी दिवसभरात आवक राहिली. 

यानंतर रात्री दहाच्या सुमारास ४५ हजार क्‍युसेक आवक सुरू होती. दरम्यान, धरणात पाण्याचा ओघ सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi Dam Water Storage Rain