दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर राहणार ब्रिथ ॲनालायजरची नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील अपघातांची संख्या होणार कमी  

पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील अपघातांची संख्या होणार कमी  
जायकवाडी - जायकवाडी (ता. पैठण) येथील पैठण औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या वाहनचालकावर राहणार ब्रिथ ॲनालायजरची नजर. गेल्या एक-दोन महिन्यात पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दारू पिऊन सुसाट वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांच्या पाठपुराव्यानंतर औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ‘ब्रिथ ॲनालायजर’ यंत्र ठाण्यास तत्काळ उपलब्ध करुन दिले आहे. आता रस्त्यावर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची पंचायत होणार आहे. मंगळवारी (ता.२२) या ब्रिथ ॲनालायजर यंत्राद्वारे औरंगाबाद-पैठण रस्त्यावर श्री. पायघन, पोलिस उपनिरीक्षक प्रीती सावंत, पोलिस जमादार सतीश राऊत, एकनाथ मोरे, यशपाल चौतमल, जाकेर शेख यांनी तपासणी मोहीम हाती घेतल्यानंतर वाहनचालक घाबरल्याचे दिसले.
 

ब्रिथ ॲनालायजर 
ब्रिथ ॲनालायजर यंत्र हे वॉकीटाकीसारखे (मोबाईल) असून त्यात मोबाईलमध्ये असणारे विविध ॲप्सचे प्रकार उपलब्ध आहेत. या यंत्रात सिमकार्ड असून हे यंत्र कुठल्या ठिकाणी आहे, त्याचे ठिकाण तत्काळ कळून सदर वाहनचालक किती प्रमाणात दारू पिलेला आहे हे समजते व त्याचे छायाचित्र व संपूर्ण माहिती यंत्रातून बाहेर निघते. ज्यामध्ये सदरील वाहनाचा क्रमांक, पत्ता, वाहन परवाना क्रमांक, तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, वेळ, ठिकाण व दिनांक आदींची प्रिंट मिळते. या यंत्रात अनेक दिवसांचे अहवाल साठवून ठेवण्याची क्षमता त्यात आहे. पैठण-औरंगाबाद रस्त्यावर वाहन चालविताना चालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये. अन्यथा त्यांच्यावर या ब्रिथ ॲनालायजर यंत्राची करडी नजर राहणार आहे.

वाहन चालविताना दारू पिल्याचे या ब्रिथ ॲनालायजर यंत्रावर निष्पन्न झाल्यास वाहकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- ज्ञानेश्वर पायघन, सहायक पोलिस निरीक्षक 

Web Title: jayakwadi marathwada news breath analyzer watch on alcoholic driver