हजारो हेक्‍टर विनासंपादीत क्षेत्रात घुसले जायकवाडी धरणाचे पाणी

गजानन आवारे
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

जायकवाडी : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या निर्मितीवेळी हजारो हेक्‍टर शेती धरणासाठी संपादीत करुन धरणाची अंतिम सीमा ठरवण्यात आली होती, मात्र यावर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे संपादीत क्षेत्राच्याही पलीकडे पाणी हजारो एकरमधील उभ्या पिकात पाणी शिरले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
या वर्षी धरण शंभर टक्के भरल्याने धरणाच्या आजूबाजूच्या गावातील हजारो एकर विनासंपादित क्षेत्रात धरणाचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे पिंपळवाडी, ईसारवाडी, तारुपिंपळवाडी, बोरगाव, दाळवाडी, शेवता, अमरापूर वाघुंडी, ढाकेफळ, मावसगव्हाण, लामगव्हाण, ब्रह्मगव्हाण या परिसरातील उभ्या पिकात धरणाचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाने त्वरीत पंचनामे करण्याची मागणी शेतकरी किशोर शिरवत, जगन्नाथ बोबडे, मच्छिंद्र वाघ, भागचंद शिंदे, गणेश सांळुके, रघुनाथ डोळस, शांताराम दिलवाले, मच्छिंद्र डोळस आदी शेतकऱ्यांनी केली आहे. 

माझी शेती अमरापूर वाघूंडी शिवारात असून जायकवाडी धरण भरल्यामुळे ऊस, बाजरी, कपाशी, तूर या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपासून आम्ही दुष्काळामुळे हैराण आहोत, आता या पाण्यामुळे हातची पिके गेल्यामुळे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरीत पंचनामे करावे. 
-महेश शिंदे, शेतकरी 

पाणी शिरलेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले असून अद्यापही पंचनामे सुरू झाले नाहीत, त्यामुळे प्रशासनाने त्वरीत पंचनामे सुरू करावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील. 
-किशोर शिरवत, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi Water Destroyed Cotton Crops