Vidhan Sabha 2019 : धस, दरेकार थंड, पण बदामरावांचे बंडच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आष्टी मतदार संघातून आमदार भिमराव धोंडे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार सुरेश धस यांनीच विरोध केला होता. त्यांचे पुत्र जयदत्त धस यांच्यासह पक्षाचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथून राष्ट्रवादीचे सतीश शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल कली होती.

बीड : बहुचर्चित आष्टी मतदार संघातून जयदत्त धस व साहेबराव दरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित यांची बंडखोरी कायमच आहे. 

आष्टी मतदार संघातून आमदार भिमराव धोंडे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार सुरेश धस यांनीच विरोध केला होता. त्यांचे पुत्र जयदत्त धस यांच्यासह पक्षाचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथून राष्ट्रवादीचे सतीश शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल कली होती. तर, गेवराईतून शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बीडमधूनही भाजपचे राजेंद्र मस्के यांनी उमेदवारी दाखल केली होती.

सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जयदत्त धस, साहेबराव दरेकर, सतीश शिंदे या प्रमुख तिघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. शंभरी पार केलेल्या स्वातंत्र सैनिक साहेबराव थोरवे यांनीही माघार घेतली. बदामराव पंडित यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने गेवराई भाजपच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे. बीडमधून भाजपचे राजेंद्र मस्के यांनीही माघार घेतली. परळीत भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, माजलगावात भाजपचे रमेश आडसकर विरोधात प्रकाश सोळंके, बीडमध्ये शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, गेवराईत भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित, शिवसेनेचे बंडखोर बदामराव पंडित तर आष्टीत भाजपचे आमदार भिमराव धोंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे असा तिरंगी सामना रंगेल. केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा विरुद्ध पृथ्वीराज साठे यांच्यात लढत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaydatta Dhas and Sahebrao Darekar withdraw nomination in Beed