जीपीएस प्रणालीमुळे चोरीला गेलेला जेसीबीचा आठ तासात तपास

JCB.jpg
JCB.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गालगत येळी शिवारात असलेल्या एका पेट्रोलपंपावरून बुधवारी (ता.२१) पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी जेसीबी पळविली. सकाळी नऊच्या सुमारास ही बाब निदर्शनास आल्यानंतर जेसीबीच्या मालकाने जीपीएस प्रणाली तंत्रज्ञानाचा उपयोग करून जेसीबीचे लोकेशन मिळविले, आणि आठ तासात त्याचा तपास लागला.

उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील उज्वला रत्नदीप कुलकर्णी यांच्या मालकीची जेसीबी (क्र. एम. एच. १४ जीएस २७७९) भाडे तत्वावर कामाला दिली जाते. चालक म्हणून प्रकाश दत्ता घंटे (रा. आचलेर हल्ली मुक्काम येणेगुर) यांनी मंगळवारी (ता.२०) दररोजच्या प्रमाणे सायंकाळी सात वाजता येळी शिवारातील अलफैज पेट्रोलपंपावर जेसीबी लावली आणि तो येणेगुरला गेला. बुधवारी सकाळी नऊ वाजता जेसीबी कामावर घेऊन जाण्यासाठी श्री. घंटे पेट्रोलपंपावर आले असता तेथे जेसीबी नसल्याने आजूबाजूला शोध घेतला. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. पण याबाबत कांहीच ठावठिकाणा लागत नसल्याने श्री. घंटे यांनी मालक रत्नदिप कुलकर्णी यांना माहिती सांगितली.

जे.सी.बी.ला जीपीएस सिस्टीम बसवलेली असल्याने त्या तंत्रज्ञानाचा वापर करून श्री. कुलकर्णी यांनी लोकेशन मिळवले. लोकेशन मोहोळ परीसरात दाखवत असल्याने तातडीने त्यांनी येणेगुरचे उत्तम सगर यांना सोबत घेतले. मोहाळमधील कांही मित्रांना सोबत घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास जे.सी.बी. चा शोध लावला.  जे.सी.बी. स्वच्छ करण्यासाठी कांही क्षणापूर्वीच दोन चोरट्यांनी वाशिंग सेंटरवर उभी केली होती. याबाबत मोहोळ, कामती पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सिद्धेश्वर वसंत वगरे वय २२, भगवान येलगुंडे वय १९ रा. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कामती पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर उमरगा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जे.सी.बी. व आरोपींना बुधवारी रात्री ठाण्यात आणले.  दरम्यान गुरूवारी (ता. २२) आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अशी माहिती पोलिस हवालदार बालाजी कामतकर यांनी सांगितली.

जीपीएस तंत्रज्ञानाचा झाला फायदा
२०१८ मध्ये जे.सी.बी. खरेदी केली होती, व्यवसायासाठी ती भाड्याने दिली जाते. सध्या त्याची किंमत २२ लाख आहे. चोरट्यांनी चलाखीने बनावट चावीने जे.सी.बी. पळविली, मात्र जे.सी.बी. ला जीपीएस प्रणाली असल्याने चोरीचा शोध तातडीने लागला असे रत्नदिप कुलकर्णी यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com