जेट एअरवेजच्या विमानाला धडकला पक्षी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद - मुंबईहून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या इंजिनला पक्षी धडकला आणि प्रवाशांचे प्राणपाखरू अक्षरशः कंठाशी आले. वैमानिकाने सावधपणे लॅंडिंग केल्यामुळे दुर्घटना टळली. हा प्रकार रविवारी (ता. २९) सकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीलगत घडला.

औरंगाबाद - मुंबईहून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या इंजिनला पक्षी धडकला आणि प्रवाशांचे प्राणपाखरू अक्षरशः कंठाशी आले. वैमानिकाने सावधपणे लॅंडिंग केल्यामुळे दुर्घटना टळली. हा प्रकार रविवारी (ता. २९) सकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीलगत घडला.

विमानतळाच्या परिसरातील उंच झाडावरून भल्या सकाळी उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांतील एक पक्षी सहा वाजून २० मिनिटांनी येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाच्या इंजिनला धडकला. वैमानिकाने सावधपणे लॅंडिंग केले खरे; मात्र पक्षी धडकल्याने इंजिनचे काही भाग खराब झाले. त्यामुळे पुन्हा मुंबईच्या दिशेने होणारे नियोजित उड्डाण रद्द करावे लागले. सकाळी मुंबईला जाण्यासाठी ८० प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. चेक-इन करून बोर्डिंग पास घेऊन ते विमानाच्या घोषणेची वाट पाहत असतानाच विमान रद्द करावे लागल्याचे त्यांना कळवण्यात आले. टेक ऑफ करण्यापूर्वी वैमानिकाने विमानाच्या इंजिनची पाहणी केली असता, पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनचे काही भाग खराब झाल्याचे त्याच्या लक्षात आले होते. टेक ऑफ करणे योग्य नसल्याचे मत वैमानिकाने मांडल्यामुळे जेट एअरवेजने मुंबईला जाणारे हे विमानच रद्द केले.

सायंकाळी दुरुस्ती
विमानाच्या इंजिनमधील बिघाड काढण्यासाठी सायंकाळी मुंबईहून क्रू मेंबर्स आले. त्यांनी सोबत आणलेले नवीन भाग इंजिनला जोडल्यानंतर त्या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केल्याचे जेट एअरवेजचे अहमद जलील यांनी सांगितले.

प्रवाशांची केली सोय
जेट एअरवेजच्या विमानाने रविवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची त्यांच्या सोयीनुसार व्यवस्था करण्यात आली. काहींना पुण्यापर्यंत वाहनाने सोडण्याची, तर अनेकांना सायंकाळपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती, असे श्री. जलील यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत थांबलेल्या प्रवाशांना जेट बोइंग ७३७-९०० या १९३ प्रवासी क्षमतेच्या विमानातून मुंबईकडे पाठविण्यात आले.

Web Title: Jet Airways flight dash to bird