जेट एअरवेजचे संकट औरंगाबादवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

केंद्र शासनाच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जेट एअरवेजला औरंगाबाद-उदयपूर ही विमानसेवा देण्यात आली होती; मात्र सध्या जेट एअरवेजमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संकटामुळे औरंगाबादच्या विमानसेवेवर संकट कोसळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जेट एअरवेजला औरंगाबाद-उदयपूर ही विमानसेवा देण्यात आली होती; मात्र सध्या जेट एअरवेजमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संकटामुळे औरंगाबादच्या विमानसेवेवर संकट कोसळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

औरंगाबादहून-उदयपूर-जयपूर ही विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी शहरातील उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळेच जानेवारीत उडान योजनेतून औरंगाबाद-उदयपूर विमान मार्गाची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे जेट एअरवेजमार्फत ही सेवा चालवण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जेटकडून ही विमानसेवा सुरू होईल, अशा औरंगाबादकरांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या; परंतु जेट एअरवेज सध्या अडचणीत सापडलेले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जेटच्या औरंगाबाद-मुंबई या सकाळ संध्याकाळच्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. सध्या मुंबईची दोन्ही विमाने कंपनीने बंद ठेवली आहेत. एकूणच जेट ऐअरवेज संकटात सापडल्याने औरंगाबादहून उडानअंतर्गत उदयपूर ही सेवा सुरू होईल किंवा नाही हे सांगणे अवघड आहे. असे असले तरीही स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Jet Airways Plane Disaster