महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार ठेवून वर्तन करा; आव्हाडांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

उस्मानाबाद तालुक्‍यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली असून, त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव लिहून ठेवले आहे.

उस्मानाबाद : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर टीका करू नये. आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले नाहीत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार ठेवून वर्तन करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला. उस्मानाबाद येथे प्रचारानिमित्त आव्हाड आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 

आव्हाड म्हणाले, की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी आमच्या पक्षनेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली होती. आम्ही आजपर्यंत बाळासाहेबांवर कधीही टीका केलेली नाही, किंबहुना त्यांना कायम आदरणीय मानत आलो. तेव्हा उद्धव यांच्याकडूनही तीच अपेक्षा आहे, महाराष्ट्राची संस्कृती ही नाही, याचे भान त्यांनी ठेवावे. 

उस्मानाबाद तालुक्‍यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली असून, त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव लिहून ठेवले आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आव्हाड यांनी केली. हे शेतकरी उद्धव यांना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी भेट दिली नाही. यावरून ठाकरे यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांविषयी किती आपुलकी आहे, हे दिसून येते, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

Web Title: Jitendra Awhad advise to Uddhav Thackeray for criticize Sharad Pawar