एनआरसीमुळे जातिभेदाच्या भिंती पडल्या - जितेंद्र आव्हाड 

बीड - सभेत बाेलताना जितेंद्र आव्हाड
बीड - सभेत बाेलताना जितेंद्र आव्हाड

बीड - जातिद्वेष पसरविण्यासाठी मोदी-शहांनी एनआरसी कायदा आणला. मात्र, यामुळे जातिभेदाच्या भिंती पडून विविध जाती संविधान वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत. पूर्वी कोणी "हिंदू खतरे मे', तर कोणी "इस्लाम खतरे मे' अशा घोषणा देत. आता मोदी व शहांमुळे "संविधान खतरे मे' अशी एकच घोषणा दिली जात आहे. सर्वांना एकत्र आणल्यामुळे मोदी-शहांचे आभारच मानावे लागतील, असे मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 

शहरात बुधवारी (ता. 29) संविधान बचाओ महासभा झाली. यात श्री. आव्हाड बोलत होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना अबू तालीब रहमानी, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, जेएनयू विद्यार्थी नेत्या दीपसीता धार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. आव्हाड म्हणाले, आसाममध्ये झालेल्या एनआरसीमध्ये 14 लाख हिंदू अडकले. ही लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर अशी आहे. भाजप, आरएसएसची आयडॉलॉजी असून एनआरसी, सीएए, एनपीआर हा केवळ बहाणा आहे. मागच्या दाराने त्यांना मनुस्मृतीची सत्ता स्थापन करायची आहे. 

हिटलरचा पुनर्जन्म होत असल्याचा घणाघातही श्री. आव्हाड यांनी केला. 
दीपसीता धार म्हणाल्या, देशाचे खरे गद्दार कोण आहेत? हे ओळखण्याची गरज आहे. देश मनुस्मृतीवर नाही तर संविधानावर चालतो. तिस्ता सेटलवाड यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. मौलाना अबू तालीब रहमानी यांनीही जोरदार टीकास्त्र सोडले. 

आमदार संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, सुनील धांडे, उषा दराडे, राजेंद्र जगताप, सिराजोद्दीन देशमुख, नारायण मुंडे, जनार्दन तुपे, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, सुशीला मोराळे, शेख शफिक, अशोक हिंगे, मोहन जाधव, शेख निजाम, नामदेव चव्हाण, राजू जोगदंड, पंकज चव्हाण, विशाल कदम, मेहबूब शेख उपस्थित होते. मौलाना जाकेर सिद्दीकी, ज्ञानदेव काशीद यांनी सूत्रसंचालन केले. सुनील धांडे यांनी आभार मानले. 

हेही वाचा - निर्बल पुरुषांनाही कसा होतो कच्च्या केळीचा फायदा, वाचा...

एकत्रीकरणाचे स्वप्न पूर्ण : बी. जी. कोळसे पाटील 
हिंदू-मुस्लिम व मागासवर्गीयांनी एकत्रित यावे, हे आपले तीस वर्षांपासूनचे स्वप्न आज यानिमित्ताने साकार होत आहे. देशात भाजपने अराजकता सुरू केली आहे. संरक्षण, न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. 45 वर्षांत पहिल्यांदाच भाजपच्या साडेपाच वर्षांच्या काळात सर्वाधिक बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा व भाजप हिंदूंचा खरा शत्रू असल्याचा दावा करून त्यांनी संविधान वाचविण्यासाठी ही एकी कायम ठेवण्याचे आवाहन केले. 

इंदिरा गांधींबद्दल आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य 
दरम्यान, आपल्या भाषणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. इंदिरा गांधी यांनी असेच एकेकाळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला. त्यांच्याविरोधात कोणीही बोलायला तयार नव्हते; मात्र जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन केले आणि नंतर निवडणुकीत गांधी यांचा पराभव झाला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे कॉंग्रेसमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com