esakal | परभणीत 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर; तालुकास्तरावर देखील 50 बेड- नवाब मलिक

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक
परभणीत 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर; तालुकास्तरावर देखील 50 बेड- नवाब मलिक
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गामुळे परभणीकर हैराण आहेत. बेड मिळेल की नाही या चिंतेने रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंतेत असतांनाच. त्यांची चिंता मिटविणारी बातमी आहे. परभणी शहरात 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर प्रत्येकी 50 खाटांचे कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सुमारे एक हजार नवीन खाटांची व्यवस्था आठ दिवसात केली जाणार आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे गुरुवारी (ता. 22) परभणीत आले होते. सकाळी त्यांनी शासकीय रुग्णालय, आयटीआय कोरोना रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - काळजी घ्या ! महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत

जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कोविड सेंटरमधील खाटांची संख्या वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालय, आयटीआय इमारत आणि जिल्हा परिषद कोविड रुग्णालय या ठिकाणी एकूण 700 बेड उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेच खासगी रुग्णालयामध्ये देखील सुमारे 700 बेड उपलब्ध आहेत. परंतू आगामी परिस्थिती पाहता परभणी शहरातील महापालिकेच्या कल्याण मंडप येथे 500 खाटांचे नवीन जम्बो कोरोना रुग्णालय उभारले जात आहे.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 खाटा असलेले कोरोना रुग्णालय देखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी एक हजार नवीन बेडची व्यवस्था येत्या आठ ते दहा दिवसांत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात तेराशे ऑक्सीजन सिलिंडरची निर्मिती

ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून 500 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर जनरेशनचे दोन प्लांट आपण उभारले आहेत. याचबरोबर आठ

तालुक्यांमध्ये मिनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहोत. या माध्यमातून जिल्ह्यात तेराशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली

जाणार आहे. 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अर्थात छोटी युनिट खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. भिलारी (कर्नाटक)

जिल्ह्यातून दररोज 20 केएल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.

- आमदार सुरेश वरपुडकर यांचा 140 व्हेटीलेटरच्या खरेदीचा प्रस्ताव

- जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत पालकमंत्र्यांची नाराजी

- अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी

- रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीसाठी अद्यायावत कॉलसेंटर उभारण्याच्या सुचना

-कोविड सेंटरमध्ये मनोरंजनासाठी टिव्हीसह जेवण, नास्ताही मिळणार

"जिल्ह्यात कोरोनाची परिस्थितीत गंभीर असली तरी अटोक्यात आहे. त्यामुळे मोठ मोठ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून खासगी कोविड

सेंटर सुरु करून खाटा उपलब्ध करून द्याव्यात असे मी आवाहन करतो. सेलू येथील डॉ. संजय रोडगे यांचा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे."

- नवाब मलिक, पालकमंत्री, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे