हजाराची लाच घेताना कनिष्ठ लिपिकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

लातूर - येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात एक हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकास गुरुवारी (ता. पाच) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. 

लातूर - येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात एक हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकास गुरुवारी (ता. पाच) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. 

घटनेतील तक्रारदार व त्याच्या मित्राने अहमदपूर येथील एमआयडीसीत व्यवसाय करण्यासाठी 2016 मध्ये प्रत्येकी एक हजार 800 चौरस मीटर जागा एमआयडीसीकडून घेतली होती. या जागेचा भाडेपट्टा करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तक्रारदाराने ता. 19 डिसेंबर 2016 रोजी सदरील दस्त निर्णयासाठी दाखल केला होता. त्यामध्ये स्टॅंपड्यूटी भरून दस्त घेऊन तो एमआयडीसी कार्यालयात सादर करावयाचा होता. या दस्तासाठी लागणारे चलन तक्रारदार व त्याच्या मित्राने प्रत्येकी पाच हजार 100 रुपयांप्रमाणे ता. दोन जानेवारीला स्टॅंपड्यूटी भरली होती. चलन भरण्यात आलेली पावती मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून घेऊन दस्त देण्याच्या कामासाठी कनिष्ठ लिपिक विष्णू काळे (वय 34) याने लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. यात पोलिसांनी गुरुवारी दुपारी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदाराकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना काळे याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. याकरिता उपअधीक्षक एस. एस. शेटकार, पोलिस निरीक्षक औदुंबर मोरे, चंद्रकांत डांगे, नानासाहेब भोंग, सचिन धारेकर, प्रदीप स्वामी, गोविंद जाधव यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Junior Clerk arrested