कदीर मौलानासह दोघांना अटक व सुटका 

मनोज साखरे
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

खासदार इम्तियाज यांना धक्काबुक्की प्रकरण, दंगलीच्या गुन्ह्याची नोंद 

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना व त्यांचा मुलगा ओसामा कदीर याला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्यात सोमवारी सायंकाळी बाचाबाची व धक्काबुक्की झाली. हा प्रकार कटकट गेट येथे घडला. त्यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांचा जमाव कदीर मौलाना यांच्या घरावर चालून गेला होता; परंतु पोलिसांची कुमक तेथे असल्याने कार्यकर्त्यांना त्यांनी हुसकावून लावले. यानंतर हाच जमाव जिन्सी पोलिस ठाण्यासमोर आला होता. यानंतर खबरदारी म्हणुन मध्यचे उमेदवार कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्या घरांभोवती सुरक्षा वाढविण्यात आली.

रात्री उशिरा या प्रकरणी एमआयएमतर्फे इमरान अब्दुल अजीज कादरी यांनी तक्रार दिली. त्यानुसार कदीर मौलाना, नगरसेवक अज्जु पहेलवान, ओसामा तसेच कदीर मौलाना यांचा भाऊ यांच्यासह दहा ते बाराजणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात दंगलीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर अटक करुन त्यांची सुटका करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadir Maulana arrested and released