परभणी : कडसावंगीकरांची आश्‍वासनांवर केली जाते बोळवण; मूलभूत समस्या जशास तशा

राजाभाऊ नगरकर
Wednesday, 30 September 2020

करपरा व बाण या नद्यांच्या मध्यात असलेले कडसावंगी (ता.जिंतूर) हे सुमारे दीड हजार लोकसंखेचे गाव. येथे शेती हाच एकमेव व्यवसाय असल्याने शेतकरी व शेतमजूरांची संख्या जास्त आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सत्तर वर्षातही येथील पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण इत्यादी मुलभूत सोयीसुविधा पूर्णपणे मिटल्या नाहीत.  

जिंतूर (जिल्हा परभणी) ः शेती पिकली तर मालाला योग्य भाव मिळत नाही, जास्त पाऊस झाला की हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. गावात आरोग्यासेवा नाही, पावसाळ्यात नदीला पूर, रस्त्यावर चिखल झाला की इतर गावांचा संपर्क तुटतो. शेतातही जाता येत नाही. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी कसं रहायचं, जगायचं अशा पोटतिडकीने गावची व्यथा मांडून आम्ही काय गुन्हा केला की कोणत्या जन्मीचे पाप फेडतो. अशा पोटतिडकीने गावची व्यथा मांडली. कडसावंगी येथील गावकरी भगवानराव अंभुरे, अण्णासाहेब शेळके, नारायण शेळके, तुकाराम होळपाते, अच्युत पवार, लिंबाजी शिंपले, केशव शेळके यांनी.

करपरा व बाण या नद्यांच्या मध्यात असलेले कडसावंगी (ता.जिंतूर) हे सुमारे दीड हजार लोकसंखेचे गाव. येथे शेती हाच एकमेव व्यवसाय असल्याने शेतकरी व शेतमजूरांची संख्या जास्त आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सत्तर वर्षातही येथील पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण इत्यादी मुलभूत सोयीसुविधा पूर्णपणे मिटल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना बारमाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात पावसाळ्यात अधिकची भर पडून ग्रामवासीयांचे हाल होतात. याबाबत ग्रमवासीयांनी प्रशासन, लोकप्रतिनिधींना अनेकवेळा तक्रारी करूनही आजपर्यंत काही उपयोग झाला नाही. निवडणूक आली की आश्वासनांची खैरात वाटायची अन् गावकऱ्यांनी त्या आश्वासनावर विश्वास ठेवून जगायचे हेच अद्यापपर्यंत चालत आले.
 
हेही वाचा - परभणी पोलिस दलात जम्बो बदल्या, २५६ पोलिसांचा समावेश  

रस्त्याची व पुलाची अडचण कायम

लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी अनेक वर्षांपासून गावच्या रस्त्याची व पुलाची अडचण दूर झाली नाही. परिणामी दुर करावी म्हणून वाटले नाही कारण त्यांची इच्छाशक्तीच नाही काम करण्याची. मागील दहा वर्षात गावातील कान्होबा तातेराव शेळके यांचे परभणीच्या दवाखान्यात निधन झाले. त्यांचे पार्थिव गावाकडे आणतेवेळी करपरा व येसेगावची बाणनदी या दोन्ही नद्यांना पूर आला, त्यामुळे ते पार्थिव रात्रभर वर्णा निवळी रस्त्यावर असलेल्या एका शेतातील आखाड्यावर ठेवून सकाळी चार पोहणाऱ्या लोकांनी बाजेवर बांधून गावात आणले. दुसऱ्या घटनेत राजामती नामदेव शेळके या महिलेची प्रकृती एका दिवशी रात्रीच्यावेळी अचानक गंभीर झाली. त्यावेळीसूध्दा दोन्ही नद्यांना पुर आल्याने दवाखान्यात नेता आले नाही. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने तीची प्रकृती चिंताजनक बनली. सकाळी त्या महिलेस बाजेवर बांधून नदीतून पोहून दवाखान्यात नेले. परंतू, दुर्दैवाने तिचा मृत्यु झाला. तिसऱ्या घटनेत नद्या पूराच्या पाण्याने दुथडी वाहत असल्याने सिताबाई सखाराम अंभुरे या मृत महिलेचे अंत्यसंस्कार गावपरिसरात करावे लागले. आणि ह्या सर्व घटना आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांना सांगितल्या आहेत परंतू, आजपर्यंत खोट्या आश्वासनाशिवाय पदरात काही पडले नाही याचे दुःख वाटत आहे. अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.

येथे क्लिक करा - परभणीमध्ये दोघांचा मृत्यू, ८२ पॉझिटिव्ह 

सर्व आशांवर पाणी फिरले

पिक उत्पादन समाधानकारक झाल्यावर चार पैसे हाती येऊन प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चालेल, कर्जाचे ओझे कमी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी घरातील सर्व भांडवल खर्च करून पेरणी, खुरपणी, कोळपणी, महागडी किटकनाशके फवारली. परंतू, मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसाने नदीकाठच्या शेतात पुराचे शिरल्याने तीन महिन्यापासून लेकरांसारखं सांभाळलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे खर्चही गेला अन् पिकही गेले त्यात सर्व आशांवर पाणी फिरले. त्यामुळे कधी कधी असे वाटते की, शेतकऱ्यांचा जन्मच मुळी समस्या झेलण्यासाठी झाला. - भगवानराव अंभुरे शेतकरी, कडसावंगी ता.जिंतूर.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadsavangikars are summoned on assurances; The basic problem is the same parbhani news