सोयगावच्या नगराध्यक्षपदी भाजपचे कैलास काळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (ता.13) निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे कैलास काळे यांना तेरा मते, तर शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे यांना चार मते पडल्याने भाजपचे कैलास काळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी ब्रजेश पाटील यांनी सभागृहात करताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (ता.13) निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे कैलास काळे यांना तेरा मते, तर शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे यांना चार मते पडल्याने भाजपचे कैलास काळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी ब्रजेश पाटील यांनी सभागृहात करताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेना अशी सरळ लढत झाल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना युतीत संघर्ष निर्माण झाला आहे. वर्ष 2015 मध्ये सोयगाव नगरपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना युतीत लढवण्यात आली, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला. शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्याविरुद्ध भाजपने अविश्वास ठराव तेरा मतांनी पारित केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावली होती.

या निवड प्रक्रियेसाठी सभागृहात सतरा सदस्य उपस्थित होते. त्यापैकी तेरा सदस्यांनी भाजपचे कैलास काळे यांना तर उर्वरित चार सदस्यांनी प्रतिभा बोडखे यांना हात उंचावून मतदान केले. यामध्ये भाजपचे कैलास काळे यांचा विजय झाल्याचे पीठासन अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी घोषित केले. मुख्याधिकारी सचिन तामखंडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले.

सेनेचे तीन नगरसेवक भाजपच्या पारड्यात
भाजपच्या पारड्यात शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मतदान केल्याने भाजपचे कैलास काळे यांना तब्बल तेरा मते मिळाली तर प्रतिभा बोडखे यांना चार मते मिळाली. कैलास काळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होताच भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, वसंत बनकर, कदीर शहा, अमोल निकम, मंगेश सोहनी, शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, शांताराम देसाई, युवराज वामने, दीपक पाटील, रवींद्र पाटील, संजय जावळे, नाना घुले, दिलीप पाटील, मधुकर पाटील, संजय मोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

या सदस्यांनी केले मतदान
कैलास काळे, युवराज आगे, शोभा मोरे, वर्षा मोरे, वंदना बनकर, योगेश मानकर, सुलताना देशमुख, लतीफ शहा, अनिता तडवी, सिकंदर तडवी, योगेश पाटील, मनीषा चौधरी, भागवत गायकवाड, प्रतिभा बोडखे, मंगलाबाई राऊत, सुनील तिडके, छाया काटोले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kailas Kale Elected As Soygaon Municipal Council Chief