कर्मचाऱ्यांनीच केली तब्बल 260 अडचणींवर मात!

कर्मचाऱ्यांनीच केली तब्बल 260 अडचणींवर मात!
कर्मचाऱ्यांनीच केली तब्बल 260 अडचणींवर मात!

औरंगाबादच्या शरयू टोयोटात "कायझेन' तंत्राने केला कायापालट

औरंगाबाद - उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जपानी कंपन्यांनी "कायझेन' नावाचे तंत्र यशस्वीपणे राबविले आहे. त्यातून त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे मोठमोठी ध्येय गाठता येतात, हे सिद्ध केले आहे. हे तंत्र आत्मसात करून शहरातील "शरयू टोयोटा'च्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षांत आपल्या दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी तब्बल 260 पर्याय शोधून काढले. या पर्यायांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामाची पद्धती, उत्पादन आणि सहकाऱ्यांप्रती आदर निर्माण होण्यास मदत झाली आहे.


टोयोटा कंपनीतर्फे दर्जेदार बदलांसाठी सर्व शोरूममध्ये "कायझेन' पद्धती वापरली जाते. वाळूज येथील शरयू टोयोटामध्ये 10 एप्रिल 2011 पासून कायझेनच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. कायझेन म्हणजे सातत्याने होणाऱ्या सुधारणा आणि चांगल्या कामासाठी बदल. हे तंत्र कर्मचाऱ्यांना समजण्यासाठी, रुजण्यासाठी आणि अमलात आणण्याकरिता प्रशिक्षण देण्यासाठी शरयूतर्फे "कायझेन गॅलरी' उभारण्याचा निश्‍चय करण्यात आला. या गॅलरीच्या उभारणीसाठी चाळीस हजार रुपये खर्च लागणार होता; मात्र कर्मचाऱ्यांनी गॅलरीनिर्मितीपासूनच कायझेन वापरण्याचे ठरवले. त्यांनी स्वत: माइक, नोटीस बोर्ड, पोडियम आदी वस्तू तयार करून अवघ्या साडेपाच हजार रुपयांत गॅलरी उभारली. या गॅलरीची दखल टोयोटा कंपनीने घेऊन राज्यातील सर्व ठिकाणच्या शोरूमला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर येथील 110 कर्मचाऱ्यांनी कायझेनच्या तब्बल 260 संकल्पना तयार केल्या. यापैकी बहुतांश संकल्पना अमलात आणल्या. या पद्धती राबविल्यामुळे लाखो रुपयांची बचत झाली. कायझेन पद्धतीचा अवलंब घरापासून गृहोद्योग, लघुद्योग, संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था आणि मोठ्या उद्योगांनी केल्यास अब्जावधींच्या संपत्तीची बचत होऊ शकते.

कर्मचाऱ्यांनी केलेले प्रमुख कायझेन

  • टेस्टिंग ट्रॅक : कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहक हमखास टेस्ट ड्राइव्ह घेतात. कारची टेस्ट ड्राइव्ह रस्त्यावर घेणे तितकेसे सोयीस्कर नसते. यामध्ये अपघात होऊन जीवित व आर्थिक हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी इनहाउस टेस्टिंग ड्राइव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. सातशे मीटरच्या मार्गावर स्पीडब्रेकरसुद्धा लावण्यात आले आहेत.
  • रॅट रेझिस्टंट गार्ड : कार वापरात नसताना इंजिनमध्ये अथवा कारच्या आत उंदीर घुसण्याची भीती असते. त्यामुळे गाडीचे मोठे आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी ज्या ठिकाणाहून उंदीर आत घुसतात, त्या ठिकाणी स्क्रॅपमधून जाळीचे "रॅट रेसिस्टंट गार्ड' तयार करण्यात आले.
  • चेसिस ट्रॉली : ग्राहकांच्या कारची चेसिस उचलून नेण्याचे काम कठीण असते. त्यासाठी आठ ते दहा कर्मचाऱ्यांना हाती असलेले काम सोडून चेसिसच्या कामाला लागावे लागते. त्यावर मात करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने चेसिस ट्रॉली तयार केली. त्यामुळे एक कर्मचारी ट्रॉलीद्वारे चेसिस सहज कुठेही नेऊ शकतो.

"फाइव्ह एस' प्रभावी
कायझेन तंत्रात खालील फाइव्ह S ना महत्त्व आहे. Seiri - Sorting, Seiton - order, Seiso - Clean up, Seiketsu - standardization तसेच shitsuke - Discipline. कायझेन टीम या "फाइव्ह एस'नुसार काम करते. उदा. कामाच्या ठिकाणी आवश्‍यक, तसेच अनावश्‍यक गोष्टींचा पसारा असतो. तेव्हा सर्वप्रथम दोन्ही प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या केल्या जातात आणि अनावश्‍यक गोष्टी कामाच्या ठिकाणाहून काढून टाकल्या जातात. यामुळे जरुरीची गोष्ट कमीत कमी वेळात शोधता येते. त्यानंतर सर्व आवश्‍यक गोष्टी वेगवेगळ्या गटांत विभागल्या जातात. दर्जा मानांकनाचे कामही हीच टीम करते. सर्वांत शेवटी कामाच्या ठिकाणी शिस्त पाळण्यावरही कायझेन टीम काम करते.

कायझेनचा घरीही होतो फायदा
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कायझेनसाठी इन्सेंटिव्ह, इंटर स्किल कॉम्पिटिशन, गेम्स, ट्रीप, वूमेन्स डे, बर्थडे सेलिब्रेशन, परफॉर्मन्स इन्सेटिंव्ह, झोनल स्किल कंटेस्ट आदी प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात. कायझेनचा वापर आपल्या घरीदेखील सुरू केल्याचा फायदा होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कायझेन संकल्पना सर्वोत्कृष्ट राबविल्याबद्दल गुजरात, महाराष्ट्र, गोवा विभागातून सर्वोत्कृष्ट पुरस्कार औरंगाबादच्या डीलरशिपला मिळाला होता. हे श्रेय शरयू टोयोटाचे संचालक श्रीनिवास पवार, वरिष्ठ अधिकारी आणि औरंगाबादमधील 110 कर्मचाऱ्यांचे आहे.
- वकार काझी, सरव्यवस्थापक, शरयू टोयोटा, वाळूज (औरंगाबाद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com