कन्यादानातून पित्याने घडविले समाजकार्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

'लग्नावर होणारा भरमसाट खर्च टाळून काही रक्कम समाजकार्यासाठी वापरावी, अशी कल्पना रुजवण्याचा माझा प्रयत्न आहे. जैन समाजाने पुढाकार घेऊन लग्नातील किमान दहा टक्के रक्कम गरजूंसाठी द्यावी, असे मी आवाहन करतो.''
-प्रशांत बंब, आमदार

लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील मुनोत परिवाराने गरजूंना बांधून दिलेली नव्वद घरे. (दुसऱ्या छायाचित्रात) नववधू श्रेया व वर बादल यांच्यासोबत अजयकुमार मुनोत व विद्या मुनोत.

लासूर स्टेशन येथील अजयकुमार मुनोत यांच्याकडून मोफत नव्वद घरे
लासूर स्टेशन - मुलीचा विवाह करताना कन्यादानातून समाजकार्यही घडावे, असा संकल्प करून बेघर गरजूंना तब्बल नव्वद घरकुल देण्याचा अभिनव उपक्रम लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील मुनोत परिवाराने राबविला आहे. बेघरांना सोमवारी (ता. 12) विवाहसोहळ्यात घरांच्या चाव्या देण्यात आल्या. आमदार प्रशांत बंब यांनी या विवाहाचे नियोजन केले.

लासूर स्टेशन येथील प्रतिष्ठित व्यापारी अजयकुमार मुनोत यांची कन्या श्रेया हिचा विवाह औरंगाबादचे मनोजकुमार जैन यांचे पुत्र बादल यांच्याशी जुळला. खर्चीक चालीरीती मोडीत काढून मोठा खर्च टाळायचा आणि गरिबांची मदत करायची, अशी कल्पना नववधूचे काका आमदार प्रशांत बंब यांनी मांडली. आमदार बंब यांनी कल्पना सांगतानाच मुनोत कुटुंबीयांना गरिबांना घरे बांधून देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला वर-वधूंसह दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिला.

नागपूर-मुंबई महामार्गालगत लासूर स्टेशनपासून सहा किलोमीटर अंतरावरील आरापूर या पुरातन काळी बेचिराख झालेल्या गावाला पुन्हा नव्वद घरकुले उभारल्याने नवसंजीवनी मिळाली. आरापूर गावाचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. या ठिकाणी आता पुन्हा नव्वद कुटुंबीयांचा संसार वास्तव्यास आला आहे. या वसाहतीला कला-नेमीनगर नाव देण्यात आले. दीड कोटींचा खर्च करून दोन महिन्यांत ही घरे बांधण्यात आली. तब्बल नव्वद घरकुल गरजूंना वाटण्यात आली, तेव्हा त्यांचे चेहरे समाधानाने खुलून गेले.

या एका अनोख्या विवाह सोहळ्याने गरिबांना हक्‍काचे घर मिळाले आहे आणि मुनोतांच्या श्रेयाचे लग्न मोठ्या समाधानाने पार पडले. सध्या या लग्नाचे आणि मुनोत कुटुंबीयांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विवाहप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी आणि घरकुलधारकांचे आमदार बंब यांनी सोहळ्यात स्वागत केले.

Web Title: Kanyadan social work of the Father