धनगर आरक्षणासाठी बीडमध्ये काठी अन॒ घोंगड मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

- धनगर आरक्षणासाठी बीडमध्ये काठी अन॒ घोंगड मोर्चा
- पिवळ्या टोप्या आणि हाती पिवळे झेंडे घेऊन आंदोलक सहभागी

बीड- हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी हे धनगर समाजाचा पारंपारिक पेहराव असलेले आणि डोक्यावर पिवळ्या टोप्या परिधान करुन हाती पिवळ्या रंगाचे झेंडे उंचावत आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत समाज बांधवांचा मोर्चा सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तसेच, टाळ मृदंगाच्या गजरात भजन गात आरक्षणाची मागणी करण्यात आली. 

संबुळ वाजवत आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच, देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही अशा घोषणांनी परिसर दणानून गेला. यशवंत सेनेच्या पुढाकाराने काढलेल्या मोर्चात समाजातील युवक आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी निदर्शने आणि घोषणा देण्यात आल्या.

हक्काच्या आरक्षणापासून समाजाला वंचित ठेवले जात आहे, सत्तेत आल्यानंतर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षणाची घोषणा करणाऱ्या सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या टिस संस्थेने अहवाल देऊन दोन वर्षे उलटले तरी त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. यशवंत सेनेचे भारत सोन्नर, शिवाजी प्रभाळे, रणजित खांडेकर, अशोक भावले, हरिभाऊ निर्मळ, निर्मळ बाळासाहेब, अंकुश गवळी, बाबू शिंदे, राम काळे, रामनाथ यमगर, कैलास निर्मळ, कृष्णा पितळे, अमोल पितळे, लक्ष्मण लकडे, भास्कर देवकते, विशाल पांढरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Web Title: Kathi And Ghongad Morcha in Beed for Dhangar reservation