शहरात घुमला ‘वुई वाँट जस्टिस’चा नारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे चिमुकलीवर अत्याचार झाला. यासह देशभर सुरत, बिहार आणि ठिकठिकाणीसुद्धा बलात्कार आणि हत्याकांडाच्या घटना समोर येत आहेत. याचा निषेध करण्यासाठी शहरातील नेटिझनतर्फे रविवारी (ता. १५) सायंकाळी शहरात ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात आला. या वेळी ‘वुई वाँट जस्टिस’चा नारा देत आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.

या कँडल मार्चमध्ये शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काही दिवसांपासून सोशल मीडियातून केले जात होते. त्याअनुषंगाने रविवारी क्रांती चौक, पैठणगेट, रोशन गेट, विद्यापीठ गेट, गांधी पुतळा येथे कँडल मार्च काढून निषेध व्यक्‍त करण्यात आला. यामध्ये सर्वच स्तरांतील आणि वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. 

काँग्रेसनेही केला निषेध 
औरंगाबाद ग्रामीण जिल्हा काँग्रेसतर्फे गांधी भवन शहागंज ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये आमदार अब्दुल सत्तार, पक्षाचे शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, जगन्नाथ काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

विद्यापीठ गेटवर श्रद्धांजली 
एसएफआय संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेटजवळ रविवारी (ता. १५) डॉ. उमाकांत राठोड यांच्या उपस्थितीत निषेध आणि श्रद्धांजली सभा घेण्यात आली. 

कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, प्राजक्ता शेटे, मनीषा मगरे, शीतल बहीरम, नम्रता कुरील, नर्मदा टांगडे, सोनाली नाखाते, पुर्णिमा वाव्हाने यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

अशा आहेत मागण्या...
बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. 
निर्भया ॲक्‍ट अमलात आणून त्याची कडक अंमलबजावणी करावी.
गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या संघटनांवर कायमस्वरूपी बंदी आणावी.
राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा.
सार्वजनिक स्थळ, शैक्षणिक परिसर, धार्मिक स्थळे येथे सीसीटीव्ही बसवावेत.

Web Title: Kathua in Jammu and Kashmir and Unnao in Uttar Pradesh case we want Justice in aurangabad