रॉकेल मिळत नसल्याने अंत्यविधीसाठी डिझेलचा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नुकतेच सारोळा (ता. कन्नड) गावात एका व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या चितेला अग्निडाग देण्यासाठी परिसरात कुठेच रॉकेल उपलब्ध न झाल्याने नातेवाइकांची तारांबळ उडाली. अखेर डिझेलचा वापर करून अंत्यविधी उरकण्यात आला.

नाचनवेल - परिसरात कोणत्याही गावात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेलचा सर्रास वापर केला जात आहे.

शासनाने जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी गावागावात स्वस्त धान्य दुकानांसह रॉकेल विक्रेत्यांची परवानाधारक दुकाने थाटलेली आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या समस्या सुटण्यासाठी शिधापत्रिकेद्वारे अन्नधान्याचा पुरवठा प्रत्येक घटकापर्यंत मिळत होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांत रॉकेल येणे बंद झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नुकतेच सारोळा (ता. कन्नड) गावात एका व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या चितेला अग्निडाग देण्यासाठी परिसरात कुठेच रॉकेल उपलब्ध न झाल्याने नातेवाइकांची तारांबळ उडाली. अखेर डिझेलचा वापर करून अंत्यविधी उरकण्यात आला. यावेळी होणारा त्रास टाळण्यासाठी काही प्रमाणात रॉकेल दुकानावर उपलब्ध करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पुरवठा विभागाकडून रॉकेलच मिळत नसल्याने ग्राहकांना रॉकेल कसे देणार? 
- शिवाजी सोनवणे, स्वस्त धान्य दुकानदार

रॉकेल हे संसारात अत्यावश्‍यक असून, याशिवाय मृत पावलेल्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी रॉकेलची नितांत गरज भासते. इतर पर्यायी व्यवस्था घातक ठरू शकते.
- अवधूत थोरात, ग्रामस्थ

Web Title: Kerosene Funeral Diesel use