औरंगाबादेत खैरे विरुध्द एमआयएम संघर्ष 

chandrakant-khaire
chandrakant-khaire

औरंगाबाद - कंपनी कामगार ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडाळात मंत्री आणि सलग चारवेळा लोकभेत विजयी होण्याचा विक्रम असलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे व एमआयएम यांच्यात शहरातील धार्मिक अतिक्रमण हटवण्यावरुन खटके उडत आहे. विशेष म्हणजे खैरे यांच्या विरोधात थेट एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. एकीकडे संपुर्ण एमआयएम खैरेंच्या विरोधात मैदानात उतरली असतांना शिवसेनेने मात्र खासदार खैरे यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. एमआयएमने खैरे यांच्यावर दंगल घडवण्याची ऑडिओ टेप प्रसार माध्यमातून जाहिर केल्यानंतरही खैरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा एकही पदाधिकारी अद्याप समोर आलेला नाही हे विशेष. 

प्रचंड धार्मिक, श्रध्दाळू आणि थोरा-मोठ्यांपुढे नतमस्तक होणारा नेता म्हणून खैरे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. त्यामुळे मंदिराचा जिर्णोधार, भंडारा, भागवत साप्ताह यात खैरे तन-मन-धनाने सहभागी होतात. वरील कारणांसाठी कुणी त्यांच्याकडे गेले तर त्याला ते रिकाम्या हाताने पाठवत नाही. वर्षाच्या बाराही महिने ब्रम्हवृंदा मार्फत धार्मिक कार्यक्रम, भोजन आणि अडल्या-नडल्याला मदत हेच त्यांचा चारवेळा खासदार निवडीमागचे गमक समजले जाते. जितके धार्मिक तितकेच धुर्त राजकारणी म्हणून देखील खैरे यांची ख्याती आहे. "मातोश्री' वरील निष्ठा आणि पक्षासाठी काहीपण करण्याची तयारी ही त्यांची बलस्थाने. म्हणून खैरेंना डावलून मातोश्रीवर गलेल्या अनेकांचे राजकारण त्यांनी सुरु होण्याआधीच संपुष्टात आणले. असे खासदार चंद्रकांत खैरे सध्या पक्षात एकाकी पडल्याचे चित्र एमआयएम विरोधातील संघर्षावरून सध्या तरी दिसते. 

खैरेंचा धार्मिकबाणा 
महापालिकेच्यावतीने शहरात धार्मिक अतिक्रमणे हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. बायजीपुरा भागात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूची घरे, दुकाने आणि मंदिरांवर बुल्डोझर चालवणार असे कळताच खैरे यांच्यातील धार्मिकबाणा उफाळून आला आणि त्यांनी बायजीपुऱ्यात धाव घेतली. मशिदी सोडून मंदिरांचीच पाडापाडी करत असल्याचा आरोप करत त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांनी पिटाळून लावले. पुरातन महादेवाचे मंदीर रहिवाशांच्या परवानगीशिवाय पाडू नका अशी भुमिका घेत सहानुभूतीही मिळवली. दरम्यान एका हिंदूचे दूकान खाली करण्यासाठी एमआयएमचा नगरसेवक दबाव आणत असल्याचे समजाच खैरे पुन्हा धावले, आणि त्यातून दंगल भडकावण्याची भाषा व त्याच्या टेपचे प्रकरण समोर आले.

घेरण्याचा डाव 
वाळूज येथे झालेल्या धार्मिक अतिक्रमण हटाव मोहिमेच्यावेळी देखील खैरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अनेक मंदिरे वाचवली होती. परिणामी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आली होती. लोकसभा निवडणुकीत डोळे झाकून खैरे यांना शहारपेक्षाही ग्रामीण भागातून सर्वाधिक मतदान होते. पण सबसे बडा बाबा ही त्यांना समर्थकांनी दिलेली पदवी सार्थ ठरवण्यासाठी खैरेकडून केले जाणारे राजकारण आता त्यांच्यावरच उलटायला लागले आहे. धार्मिक अतिक्रमणांच्या बाबतीत घेतलेली आक्रमक भुमिका त्यांना लोकसभा निवडणूकीत मतदान मिळवून देणारी असली तरी स्वपक्षातील विरोधक वाढवण्यास देखील कारणीभूत ठरत आहे. दंगल भडकावण्याच्या टेप प्रकरणावरून एमआयएमने खैरे यांना घेरण्याची तयारी केली असतांना सेनेतील खैरे विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. आमदार इम्तियाज जलील व खैरे यांचे विरोधक व जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. अंबादास दानवे, संजय सिरसाट, संदीपान भुमरे, हर्षवर्धन जाधव, माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, राजू वैद्य अशी कितीतरी स्वपक्षातील खैरे विरोधकांची नावे देता येतील. शिवसेनेतील सर्व पदाधीकारी, लोकप्रतिनिधी एकाबाजूला तर खासदार खैरे दुसऱ्या बाजूला अशी काहीसी परिस्थीती शहरात आहे. काही महिन्यापुर्वी जाहिर पत्रकार परिषद घेऊन दानवे हटावची मागणी करणाऱ्या आमदार संजय सिरसाट यांनी अचानक दानवेंशी हातमिळवणी केली आणि आपल्या मतदारसंघातील अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांना थेट उपमहापौर केले. याशिवाय दानवे गटाचे मनगटे व कुलकर्णी यांना महापालिकेच्या अनुक्रमे सभृाहनेता व गटनेता पदावर बसवत खैरे यांच्यावर मात केली. आता एमआयएमने घेरल्यावर या लढाईत खैरे यांना एकटे पाडण्याची चाल पक्षातील विरोधकांनी खेळली आहे. यावरही मातोश्रीचा प्रचंड विश्‍वास असल्याने आज बघ्याची भुमिका घेणारे उद्या खैरेंच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले तर नवल वाटायला नको. शेवटी सबसे बडा बाबा खैरे बाबा... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com