ओमानमध्ये झालेल्या ढगफुटीत माजलगावचे खान कुटुंबीय बेपत्ता

कमलेश जाब्रस
रविवार, 19 मे 2019

जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत.

माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा सरदार कारमधून बाहेर पडल्याने सुखरुप असून, इतर सात जणांचा तेथील प्रशासन हेलिकॉप्टरद्वारे परिसरात शोध घेत आहेत. तसेच बेपत्ता झालेल्या शेकडो लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

खैरुल्ला खान सत्तार खान (वय 52 वर्षे) हे जिल्ह्यातील माजलगाव येथील बुखारी शाळेतील माजी शिक्षक आहेत. खान आपल्या पत्नीसह ओमान देशात मस्कत येथे आयबीअल हैथम मेडिकल सेंटर येथे असलेला मुलगा सरदार खान यास भेटण्यासाठी 6 मेला माजलगाव येथून गेले होते. शनिवारी ते आपला मुलगा सरदार, सून व तीन नातवंडे, चार वर्षीय मुलगी, दोन वर्षीय मुलगा, 22 दिवसांचा एक मुलगा अशी सर्व मिळून एका कारमध्ये पर्यटन स्थळ असलेल्या ‘वादी बीन खालिद’ येथे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वारे सुटले. काही क्षणांतच जोरदार धुके पसरून मोठा पाऊस झाला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन हा परिसर जलमय झाला.

यावेळी खान कुटुंबीयांपैकी सरदार खान हा गचके बसत का आहेत, हे पाहण्यासाठी गाडीबाहेर उतरला. त्याचवेळी पाण्याचा प्रचंड झोत गाडीच्या आतमध्ये शिरला गाडीला वाहून घेऊन गेला.

गाडीबाहेर आलेला मुलगा कसाबसा पोहोत एका झाडाकडे सरकला व फांदीला धरून ठेवल्याने तो सुखरूप वाचला. या घटनेने देशात भारतीय उपखंडातून याठिकाणी गेलेले अनेक पर्यटक अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. ओमान सरकारकडून हेलिकॉप्टरद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, माजलगाव येथील राज गल्लीत राहणाऱ्या खान कुटुंबातील सदस्य व नातेवाईक चिंतेत असून, याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने मदतीसाठी त्वरीत ओमान देशास संपर्क साधावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khan Family Missing in Cloudburst of Oman